इंडिया-थायलंड ग्लोबल व्हिजन कॉन्क्लेव्ह-2026
10 देशांतील 130 पेक्षा अधिक प्रतिनिधींची उपस्थिती
। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
कोल्हापूरातील ग्लोबल व्हिजन ट्रेड ऑर्गनायझेशन (GVTO) मार्फत, बँकॉक, थायलंड येथे नुकतेच पहिले ‘इंडिया-थायलंड ग्लोबल व्हिजन कॉन्क्लेव्ह 2026’ पार पडले. भारत-आसीयान-आफ्रिका विकास कॉरिडॉरमध्ये अर्थपूर्ण सीमापार भागीदारी घडवून आणण्यासाठी आशिया व अन्य खंडांतील उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातील नेते या परिषदेत एकत्र आले होते. या परिषदेत 130 प्रतिनिधी, 50 हून अधिक उद्योजकांसह दहा देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 25 मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
कोल्हापूरसाठी विशेष अभिमानास्पद गोष्ट अशी की, सीमेपलीकडे व्यापार विस्तार करण्यासाठी थायलंडसह इतर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी स्थानिक कोल्हापूरच्या एमआयडीसी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दर्शविले. यासाठी परदेशी कंपन्यांशी सहाय्य करण्यास इच्छुक कंपन्यांनी परिषदेत सहभाग घेतला आणि प्राथमिक करार करण्यात आले.
भारत-थायलंड आर्थिक संबंध दृढ करणाऱ्या उपक्रमाबद्दल भारताचे थायलंडमधील राजदूत महामहीम पुनीत अग्रवाल आणि भारतीय दूतावास, बँकॉक यांचे विशेष सहकार्य लाभले.
या परिषदेला थायलंडचे माजी उपपंतप्रधान महामहीम कॉर्न दब्बरांसी, इंटरनॅशनल ट्रेड कोर्टचे न्यायमूर्ती लुई लामा, थाई-इंडिया बिझनेस अलायन्स (TIBA) चे संस्थापक अध्यक्ष अजयन पॉल नरूला, इन्फॉर्मा मार्केट्सचे ग्रुप पोर्टफोलिओ संचालक फ्रेझर हॉक्स, पीपल्स रिफ्लेक्शन्सचे संचालक श्रीकांत घरत, जीव्हीटीओचे अध्यक्ष डॉ. अक्षय शिंदे आणि कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी (Chief Marketing Officer) राहुल आर्य उपस्थित होते.
प्रमुख पुरस्कारार्थींमध्ये भारत-आसीयान कॉरिडॉरमधील उत्पादक आणि पुरवठादार यांच्यातील साखळी सेवांमधील उत्कृष्टतेबद्दल बिपीन अगरवाल यांना Cross Border Trade Leadership Award, महिला उद्योजिका हिना मोतीवाला, कृषी व्यावसायिक श्रीकांत घरत, दस्तऐवज प्रक्रिया स्वयंचलनातील कार्याबद्दल अश्विनी मोईली, डिजिटल इनोव्हेशनमध्ये विवेक सिंग, तसेच दहा हजाराहून अधिक लेखकांचे डिजिटल व्यासपीठ उभारल्याबद्दल श्रीकांत घरत यांचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतीय संस्थांना पाठबळ मिळावे यासाठी वरिष्ठ राजनैतिक व शासकीय प्रतिनिधींचे सहकार्य उपलब्ध होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. भारतीय कंपन्यांना जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तारासाठी मोठ्या संधी उपलब्ध असून उत्पादक, निर्यातदार, आयातदार व संस्थात्मक गुंतवणूकदारांना जोडणारे आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार झाले आहे.
परिषदेत माजी उपपंतप्रधान कॉर्न दब्बरांसी यांनी, ‘हे पुरस्कारार्थी म्हणजे भारत-आसीयान व्यापाराचे भविष्य आहेत. आज त्यांना आसीयानमधील खरेदीदार, भागीदार आणि गुंतवणूकदारांच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळाला आहे’, असे सांगून उद्योग विस्तारासाठी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
ग्लोबल व्हिजन ट्रेड ऑर्गनायझेशन
ग्लोबल व्हिजन ट्रेड ऑर्गनायझेशन (GVTO) ही भारत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यवसाय नेटवर्किंग आणि गुंतवणूक सहकार्याला चालना देणारी जागतिक संस्था आहे. 2019 पासून भारत-थायलंड व्यापार उपक्रमापासून सुरुवात करून आज जीव्हीटीओ 40 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. संस्थेने 500 कोटी रुपयांहून अधिक संभाव्य व्यापार संधी निर्माण करून सुमारे 900 उद्योगांना जागतिक बाजारपेठांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. प्रदर्शने, व्यापार प्रतिनिधी मंडळे, बिझनेस मॅचमेकिंग, संरचित नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय गौरव मंचांच्या माध्यमातून जीव्हीटीओ एमएसएमई आणि प्रथमच निर्यात करणाऱ्या उद्योजकांसोबत कार्य करते.
