पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘आशा की किरण फाऊंडेशन’चे कौतुक

| पनवेल | प्रतिनिधी |

‘आशा की किरण फाऊंडेशन’ ही संस्था नशा मुक्ती क्षेत्रात सातत्यपूर्ण, शास्त्रोक्त आणि कायदेशीर चौकटीत राहून कार्य करत आहे. या व्यसनमुक्ती केंद्राला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील डीसीपी, क्राईम ब्रांच व नार्कोटिक्स विभागाच्या अधिकारी वर्गाने भेट देत संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी संस्थेतील वैद्यकीय उपचार पद्धती, रुग्णांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, सुरक्षित व शिस्तबद्ध व्यवस्थापन, तसेच कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन यांची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी व्यसनमुक्ती अभियानाबाबत सविस्तर चर्चा केली.

अनेक वर्षांपासून वैद्यकीय उपचारांसोबतच समुपदेशन, योग, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध उपक्रम राबवून रुग्णांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक पुनर्बांधणीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सण-उत्सव, प्रेरणादायी कार्यक्रम आणि सकारात्मक वातावरणाच्या माध्यमातून रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेकडून केले जाते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी संस्थेचे प्रमुख बशीर कुरेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजाला निरोगी, सक्षम आणि जबाबदार नागरिक घडण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले. व्यसनमुक्ती ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून सामाजिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Exit mobile version