आशा स्वयंसेविकेमुळे अत्याचार उघड

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे धक्कादायक प्रकरण पनवेल महापालिकेच्या एका आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेवकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित मुलीच्या वयाबाबत संशय निर्माण झाल्याने आशा स्वयंसेविकेने तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत जागरूक आशा स्वयंसेविकेने याबाबतची तक्रार रविवारी नोंदविली. पनवेल शहरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्र क्रमांक 2 कोळीवाडा येथील नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेच्या जागरूकतेमुळे एका बालविवाहाला वाचा फुटली. पिडिता काही दिवसांपूर्वी गरोदर असल्याने ती विविध चाचण्या करण्यासाठी या आरोग्य केंद्रात आली होती.

याच आरोग्य केंद्रातील जागरूक आशा स्वयंसेविकेच्या ती संपर्कात आली. त्यानंतर या बालिकेच्या वया विषयी संशय आल्याने पिडितेच्या वयाची खात्री केल्यानंतर ती बालिका 14 वर्षांची असून, ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर आशा स्वयंसेविकेने संबंधित बाब या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. नेहा म्हात्रे आणि महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यापर्यंत पोहचवली.

या दरम्यान बालिकेसोबत असलेल्या व्यक्तीने स्वतःची ओळख तिचा पती असे केली. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संशय अजून बळावला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्यासमोर हे प्रकरण आल्यावर त्यांनी या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकते यांच्याकडे सोपवला. उपनिरीक्षक देवकते यांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये बालिका अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही 19 वर्षीय प्रकाश लोहार याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊन तिला गरोदर केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी तातडीने संबंधित प्रकरणातील संशयीत आरोपी प्रकाश लोहार याला अटक करून सोमवारी पनवेल येथील न्यायालयासमोर हजर केले.

पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवकांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे हे प्रकरण उजेडात आले असून, महापालिकेच्या आरोग्य केंद्र क्रमांक 2 च्या वैद्यकीय आरोग्य सेवकांचा लवकरच आयुक्तांच्या हस्ते कौतुक करणार असल्याचे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी यांनी सांगीतले.
Exit mobile version