। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी तालिबानने देशात सत्ता हस्तगत करण्यापूर्वी काबूल सोडल्याबद्दल लोकांची माफी मागणारे निवेदन जारी केले आहे. अफगाण लोकांशी त्यांची बांधिलकी कधीही डगमगली नाही. तसेच हा अनुभव आयुष्यभर मार्गदर्शन करेल.
अफगाणिस्तानमधील युद्ध वेगळ्या पद्धतीनं ते समाप्त करू शकले नाहीत, असं म्हणत घनी यांनी माफी घातली. बंदुका न उचलून काबूलमधील 60 लाख लोकांना वाचवण्यासाठी आपण देश सोडला, असेही ते म्हणाले. तसेच देशाच्या कोषागारातून लाखो डॉलर्स रोख रक्कम घेऊन काबूल सोडल्याच्या वृत्तांचं त्यांनी खंडन केले आहे.
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी तालिबानने देशावर कब्जा मिळवण्यानंतर यूएईमध्ये पळून गेले. त्यांच्यावर तालिबानच्या नेतृत्वाखाली अनिश्चिततेच्या गर्तेत देशाला सोडून पळून गेल्यामुळे जगभरातून टीका झाली. त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या निवेदनात म्हटलंय की, तालिबानने अनपेक्षितपणे शहरात प्रवेश केल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी अचानक काबुल सोडल्याबद्दल मी अफगाण लोकांना स्पष्टीकरण देतोय. पॅलेसच्या सुरक्षा अधिकार्यांच्या विनंतीनंतर मी देश सोडला. त्यांनी मला 1990च्या गृहयुद्धाप्रमाणे शहराच्या रस्त्यांवर लढाई होईल, असं म्हटलं होतं. काबूल सोडणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. पण बंदूक न घेता काबूल आणि देशातील 60 लाख लोकांना वाचवण्याचा हा एकमेव मार्ग होता, असे यांनी म्हटले आहे.