। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एसटीमधील प्रवासी संख्या वाढावी, प्रवाशांना एसटीबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, तसेच एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी विविध मार्गाने आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एसटी महामंडळाने 14 ऑगस्टपासून अष्टविनायक दर्शन याचा सुरू करण्याचा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांच्या यात्रेच्या प्रवास खर्चासाठी प्रौढ भक्तांना एक हजार 200 रुपये, तर मुलांसाठी 600 रुपये भाडे असणार आहे. अगदी कमी दरात भक्तांना अष्टविनायक दर्शन घेता येणार आहे.
14 ऑगस्टपासून सुरु होणारी ही दोन दिवसांची अष्टविनायक दर्शन यात्रा अलिबाग एसटी बस स्थानकातून सकाळी साडेसात वाजता सुरु होईल. अलिबाग, वडखळ, पाली, महड, लोणावळा मार्गे नारायणगाव, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, सिद्धटेक, मोरगाव, थेऊर त्यानंतर स्वारगेटमार्गे परत अलिबाग असा प्रवास असणार आहे. 14 ऑगस्ट रोजी ओझर देवस्थानमध्ये मुक्काम होणार आहे. दुसर्या दिवशी 15 ऑगस्ट रोजी अन्य अष्टविनायक दर्शन घेऊन एसटीबस अलिबागकडे रवाना होणार आहे. रात्री पावणे दहा वाजेपर्यंत बस अलिबागमध्ये पोहोचणार आहे.
प्रवासी संख्या वाढावी यासाठी महामंडळ वेगवेगळे उपक्रम सवलतीच्या दरात राबवित असतात. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवासी आवडीने एसटीतून प्रवास करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या खासगी वाहनांतून धार्मिक पर्यटन स्थळांना पर्यटक भेटी देतात. प्रवाशांची ही गरज ओळखून अलिबाग एसटी बस आगारातील आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांच्या संकल्पनेतून खास अष्टविनायक दर्शन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांना थेट अष्टविनायक दर्शन एसटी बसमधून घेता येणार आहे. आरक्षण नोंदणीची व्यवस्था स्थानकात केली आहे, असे आवाहन आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी केले आहे.
एसटीबद्दलचा प्रवाशांमधील विश्वास कायम टिकवून ठेवण्यासाठी, तसेच प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी धार्मिक स्थळ दर्शन उपक्रम सुरु केले आहेत. या उपक्रमांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.
अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग