। पेण । वार्ताहर ।
पेण शहरातील गांधी मंदिर वाचनालयासमोरील हुतात्मा स्मारकाबाबत ‘कृषीवल’ने ‘पेणमधील हुतात्मा स्मारक दुर्लक्षित’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिका अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करून स्मारकाच्या संरक्षण भिंतीवरील सर्व बॅनर्स काढून टाकले. व तसेच या स्मारकाभोवती असणार्या अनधिकृत टपर्यादेखील हटविण्यात आल्या आहेत. आता हुतात्मा स्मारकाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले होते की, एका दिवसात हुतात्मा स्मारक परिसर सुशोभित करून त्यावर विद्युत रोषणाईदेखील केली जाईल. त्याप्रमाणे हुतात्मा स्मारकाच्या सभोवताली राष्ट्रध्वजाच्या रंगाची रोषणाईची व्यवस्थादेखील केली आहे. कृषीवलने हुतात्मा स्मारकाचा मुद्दा घेऊन नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यामुळे स्मारकाला खर्या अर्थाने न्याय मिळाला आहे. त्यामुळे ‘कृषीवल’च्या संपादकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. तसेच, पेण नगरपालिकेच्या या धडक कारवाईबाबत मुख्याधिकारी जीवन पाटील यांचेदेखील आभार व्यक्त केले जात आहे.
हुतात्मा स्मारकाची मी पूर्ण पाहणी करून त्याचे नव्याने सुशोभिकरण करून घेणार आहे. यापुढे कोणताही बॅनर अगर अनधिकृत टपरी स्मारकाच्या परिसरात लावल्यास कायदेशीर कारवाई करून गुन्हेदेखील नोंदविले जातील.
जीवन पाटील, मुख्याधिकारी