अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरण…

अंतिम युक्तिवाद संपला, आता प्रतीक्षा निकालाची

| पनवेल | प्रतिनिधी |

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे हत्याकांड खटल्याचा अंतिम युक्तिवाद संपला असून, आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. पनवेल सत्र न्यायालयात नुकत्याच झालेल्या तारखेला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आपला लेखी युक्तिवाद अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्याकडे सादर केला. या खटल्याची मॅरेथॉन सुनावणी सुमारे सहा वर्षे सुरू होती. अंतिम युक्तिवाद संपल्यामुळे या सुनावणीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाला सर्वाधिक बदनाम करणार्‍या अश्‍विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी 30 नोव्हेंबर 2018 रोजी अलिबाग जिल्हा न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, पुढे पनवेल येथेही जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झाल्यानंतर हा खटला पनवेलमध्ये वर्ग करण्यात आला. सहा वर्षे चाललेल्या या सुनावणीमध्ये सुमारे 80 साक्षीदार न्यायालयाने तपासले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत आणि आरोपींचे वकील विशाल भानुशाली यांचा युक्तिवाद झाला. घरत यांनी आपला लेखी युक्तिवाद शुक्रवारी झालेल्या तारखेला न्यायालयात सादर केला. त्यामुळे आता न्यायालयाने निकालपत्राची प्रक्रिया सुरू केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या खटल्याचा निकाला येत्या दोन महिन्यांत लागणार असल्याची शक्यता कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अभय कुरुंदकर आणि अश्‍विनी बिद्रे यांच्यात प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून कुरुंदकर याने 11 एप्रिल 2016 रोजी रात्री मीरा रोड येथे अश्‍विनी यांची हत्या केली. त्यानंतर लाकडे कापण्याच्या कटरने मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. दुसर्‍या दिवशी मृतदेहांचे हे तुकडे भरलेली गोणी वसई खाडीत फेकून देण्यात आली. अश्‍विनी अचानक बेपत्ता झाल्यानंतर 14 जुलै 2017 रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. त्यांना गायब करण्यामागे कुरुंदकरचा हात आहे हे उघड झाल्यानंतर 31 जानेवारी 2017 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीला पाठीशी घातले
कुरुंदकर हा पोलीस दलाचा लाडका अधिकारी होता. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी त्याला पाठीशी घातल्याने अश्‍विनी यांच्या नातेवाईकांना मोठा संघर्ष करावा लागला. या गुन्ह्याचा तपास लेडी सिंगम म्हणून ओळख असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांच्याकडे आला आणि कुरुंदकरच्या पापाचा घडा भरला. 7 डिसेंबर 2017 रोजी कुरुंदकरला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यानंतर दुसरा आरोपी राजू पाटील याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यापाठोपाठ 20 फेब्रुवारी 2018 रोजी कुंदन भंडारी आणि 26 फेब्रुवारी 2018 रोजी महेश फळणीकर हे गजाआड झाले. या सर्वच आरोपींची कसून चौकशी झाल्यानंतर 1 मार्च 2018 रोजी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला.
Exit mobile version