आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

आयुष शेट्टीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

| निंगबो (चीन) | वृत्तसंस्था |

भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टी याने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष एकेरी गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला. भारताच्या इतर खेळाडूंना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणोय व उन्नती हुडा यांच्याकडून एकेरी गटातील लढतीत निराशा झाली.

आयुष शेट्टी याने चीन तैपईच्या ची यू जेन याच्यावर 21-16, 21-12 असा सरळ दोन गेममध्ये विजय संपादन केला. आयुष शेट्टी याने 41 मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली. आता पुढील फेरीमध्ये त्याच्यासमोर इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्ती याचे आव्हान असणार आहे.

पी. व्ही. सिंधू हिच्याकडून सपशेल निराशा झाली. चीनच्या वँग झियी हिने पी. व्ही. सिंधू हिला 21-18, 21-8 असे नमवले. भारताच्या फुलराणीचा 46 मिनिटांमध्ये पराभव झाला. पुरुषांच्या एकेरीमध्ये एच. एस. प्रणोय याने झुंज दिली, पण त्याचाही पराभव झाला. चीनच्या वेंग हाँग यांग याने एच. एस. प्रणोय याला 21-12, 21-19 असे पराभूत केले.महिला एकेरीतील अन्य लढतीत भारताच्या उन्नती हुडा हिलाही प्रभाव टाळता आला नाही. टी. मियाझाकी हिने उन्नती हुडा हिला सरळ दोन गेममध्ये नमवले. टी. मियाझाकी हिने उन्नती हुडाचे आव्हान 21-17, 21-9 असे परतवून लावले. चेन टँग जी-तोह वेई या जोडीने ध्रुव कपिला-तनीषा क्रॅस्टो या जोडीवर 21-13, 21-14 असा सरळ दोन गेममध्ये विजय संपादन केला. पाचवी मानांकित जोडी वाय. फुकूशिमा-एम. मातसमोतो यांनी कोनजेंगबाम-श्रुती मिश्रा या भारतीय जोडीवर 21-10, 21-13 असा सहज विजय मिळवला.

अव्वल दर्जाचा खेळ
आयुष शेट्टी-ची यू जेन यांच्यामधील लढतीत पहिल्या गेममध्ये चुरस पाहायला मिळाली. सुरुवातीला 10-6 असा पिछाडीवर असलेल्या आयुष शेट्टी याने 12-12 अशी बरोबरी साधली. त्यानंतर चीन तैपईच्या खेळाडूकडून चुका झाल्या व आयुष शेट्टी याने 18-14 अशी आघाडी घेत पुढे जाऊन पहिला गेम 21-16 असा आपल्या नावावर केला. पुढील गेममध्ये आयुष शेट्टीच्या अव्वल दर्जाच्या खेळासमोर ची यू जेन याचा निभाव लागला नाही. अखेर त्याला 21-12 अशी हार पत्करावी लागली.
Exit mobile version