कृषीवलच्या दणक्याने महसूल विभागाची कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील उसडी येथे बेकायदेशीर दगड, खडी, माती उत्खनन होत असल्याची माहिती कृषीवलने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. अखेर कृषीवलच्या दणक्याने महसूल विभागाने माफियांविरोधात कारवाई केली. डंपर, पोकलन, जेसीबीसह 75 ब्रास माती, खडी जप्त करून अस्लम कादिरी याच्याविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने मुरूडमधील अवैध माती, उत्खनन करणाऱ्यांना दणका मिळाला आहे.
मुरूड तालुक्यातील उसडी येथील गट नं. 169/1,170 या जागेमध्ये बेकायदेशीररित्या माती, बूरूम उत्खनन केले जात होते. वारंवार तहसीलदार यांच्याकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. 57 लाख रुपयांचा दंड आकारूनही उत्खनन सूरू होते. आमदारांच्या कृपेने हा गोरखधंदा सुरु होता. उसडी येथील माती, खडी, बूरूम उत्खननाविरोधात कृषीवलने आवाज उठविला. अखेर कृषीवलच्या दणक्याने महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार आदेश डफल यांनी गटविकास अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी पोलिसांच्या मदतीने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उसडी येथे उत्खननाच्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पाच डंपर, पोकलन, जेसीबी व 75 ब्रासहून अधिक माती, खडी, बुरूमचा साठा असा एकूण तीन कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त करून अस्लम कादरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूरूडमध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यास महसूल विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. अखेर महसूल विभागाने कारवाई केल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुरूड तालुका पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा ठरत असताना याठिकाणी धनदांडग्यांमार्फत बंगले बांधले जात आहेत. काशीद, मुरूड परिसरात वेगवेगळ्या कारणावरून बांधकाम केले जात आहे. तसेच माती, बूरूमचे उत्खनन करून शासनाच्या जमीनीवर अतिक्रमण केले जात आहे. डोंगर पोखरले जात आहे. सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास गुन्हा दाखल करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र काशीदमधील सीआरझेडचे उल्लंघन करून होत असलेल्या बांधकामाविरोधात गुन्हे दाखल करण्यास उपविभागीय अधिकारी टाळाटाळ का करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
