| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे शहरातील येरवडा भागातील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना आहे. महिलेवर तिच्याच सहकाऱ्याने कोयत्याने वार केले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर महिलेवर त्यांच्याच कंपनीतील व्यक्तीने वार केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात जखमी झालेली महिला येरवडा भागातील आय टी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. या प्रकरणातील आरोपी सुद्धा त्याच कंपनीमध्ये कामाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दोघांमध्ये काही वाद सुरू होते. या वादातूनच त्याने हे कृत्य केल्याचे समजते. आरोपीने कोयत्याने हल्ला केल्यामुळे महिला गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.