| रसायनी | वार्ताहर |
खालापूर पोलीस ठाण्यातील केलवली गावात दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये कल्पेश दिसले याच्यावर धारदार चाकूने वार करत त्याचा सहकारी प्रशांत दिसले यालाही मारहाण करण्यात आली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कल्पेश दिसले यांनी केली आहे. दरम्यान, दोघांवर खोपोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण बीड खुर्द ग्रामपंचायत येथील केलवली आणि वणी गावाच्या मध्यवर्ती असणार्या ठिकाणी खेतान पॅकफाईन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवे उद्योग समूहाचे काम सुरू झाले आहे, तर याच व्यवसायाच्या वादातून दोन गटात वाद झाला. या वादात केळवली गावातील कल्पेश दिसले व प्रशांत दिसले या तरुणांना कुमार दिसले, कैलास दिसले आणि त्यांच्या सहकार्यांनी हॉकी स्टिकच्या सहाय्याने तसेच लाथाबुक्क्याने मारहाण केली. दरम्यान, कल्पेश दिसलेंवर कुमार दिसले यांनी धारदार चाकूने वार केला असून, यामध्ये प्रशांत दिसले व कल्पेश दिसले जबर जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात खलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कल्पेश दिसले यांनी तक्रार देताना म्हणाले की, केळवली वणी याठिकाणी खेतान पॅकफाईन प्रा.लि. कंपनीच्या जागेत कुमार दिसले, कैलास दिसले आणि इतर लोकांनी काम चालू केले असताना मी व माझा भाऊ प्रशांत दिसले असे वर्क आर्डरशिवाय काम का चालू केले अशी विचारणा करण्यासाठी गेलेलो असता सर्वांनी मिळून आम्हाला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हॉकी स्टीकचा सहाय्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मला छातीवर, मांडीवर, हातावर व माझ्या भावाला डोक्यात दुखापत केलेली असून, कुमार दिसले यांनी माझ्यावर चाकूने वार केला आहे, अशी तक्रार कल्पेश दिसले यांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.