मतांच्या राजकारणात माथेरान विकासात्मक दृष्ट्या पिछाडीवर : भूमिपुत्रांचे आजही संघर्षमय जीवन
। माथेरान । मुकुंद रांजणे |
माथेरान ह्या गावाला विकसनशील क्षेत्र बनण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे आणि यापुढेही भावी पिढीला आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी येथील आशावादी भूमिपुत्रांना आजही स्वप्नवत जीवन जगावे लागत आहे. इथली काही मोजकीच राजकीय पक्षांची मंडळी ज्यांना खरोखरच या गावासाठी काहीतरी नवीन करण्याची मनीषा आहे. त्यांनाही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कामे करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. तोपर्यंत आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत. एखाद्या पक्षाचे नेतृत्व विकासाची गंगा आणण्यासाठी कार्यक्षम असले तरीसुद्धा मुख्यमंत्री असोत किंवा अन्य खात्याच्या मंत्र्यांना ह्या गावाची कैफियत अथवा गार्हाणी कथन करावयाची झाल्यास तालुक्यातील आमदार किंवा जिल्ह्यातील खासदार याना विश्वासात घेऊन जाणे क्रमप्राप्तच आहे. अन्यथा होणार्या कामास देखील हेतूपूर्वक खोडा आणून कोणतीही विकास कामे पूर्णत्वास जाऊच शकत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव स्थानिकांना आलेला आहे आणि ही येथील वस्तुस्थिती असल्याचेही स्थानिकांमधून बोलले जात आहे.
काही दिवसांनी विधानसभा निवडणूका होणार असल्याने कर्जत खालापूर मतदार संघात उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षात चढाओढ सुरू असून तालुक्यातील गल्लीबोळात प्रचाराची धामधूम सुरूच आहे, प्रत्येक पक्षात पक्षप्रवेश त्याचप्रमाणे मतदारांच्या भेटीगाठी सुरू असून जल्लोषात वाढदिवस आणि उत्सव साजरे होताना शक्तीप्रदर्शन जोरात सुरू आहे. आपली बाजू भक्कम असल्याचा अविर्भाव इच्छुक उमेदवार आणताना दिसत आहेत. तालुक्यातील आदिवासी वाड्या असोत किंवा अन्य अडगळीच्या ठिकाणी कधी नव्हे ते तिथे जाऊन त्या भागातील लोकांची विचारपूस,त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, नादुरुस्त रस्ते, वीज,पाणी समस्या याबाबत जातीने लक्ष केंद्रित करत आहेत. याच मतदार संघात जेमतेम तीन हजारांच्या आसपास मताधिक्य असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ सुध्दा समाविष्ट आहे. परंतु आजतागायत या स्थळाकडे संबंधित निवडून येणार्या कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आजवर कानाडोळाच केलेला दिसत आहे.
आपल्या पक्षाला साधारणपणे माथेरानमधून एक हजारांच्या आसपास मते मिळणार आहेत. त्यामुळे निवडणूक काळात इकडे विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणूक असो सहसा कुणीही उमेदवार वेळ वाया घालवत नाहीत आपल्या काही कार्यकर्त्यांना पाठवून जे काही निवडणुकीचे मतांबाबतचे व्यवहार आहेत. ते पूर्ण केले जातात.जणू काही या उमेदवारांना इथल्या मतांचे काहीएक स्वारस्य नसल्याप्रमाणे वागतात. आश्वासने ही नेहमीप्रमाणे दिली जातात पण मतांच्या राजकारणामुळे अल्प मतदान असल्याने इथली विकास कामे पूर्ण करण्याची विधानसभा उमेदवारांना माथेरानच्या विकासाबाबत इच्छाशक्ती नाही.निवडून आल्यावर सुध्दा इकडे फारसे फिरकत नाहीत.
माथेरानकरांची काही मोठी मागणी नाही. फक्त याठिकाणी पर्यटनवाढीसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अन्य ठिकाणी जाण्यासाठी उत्तम प्रकारे पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी. यासाठी फिनिक्युलर रेल्वे, प्रलंबित असणारा रोपवे प्रकल्प तसेच चौक येथून मोटार वाहन रस्ता थेट रामबाग पॉईंटपर्यंत उपलब्ध होऊ शकतो. ही होणारी कामे असून त्यासाठी निवडून येणार्या आमदारांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून कामे पूर्ण करणे बाकी आमची काहीच मागणी नाही असे जाणकार ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.
स्वातंत्र्यानंतर सुध्दा आपल्या न्यायहक्कासाठी माथेरान सारख्या दुर्गम परंतु जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांना संघर्षमय जीवन जगावे लागत आहे. काही प्रश्न असल्यास शासन दरबारी खेटे मारून कामे कशीबशी पूर्ण करून घ्यावी लागत आहेत आणि जी काही अशक्यप्राय कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी आमदार, खासदार यांना विनवण्या करून आशेवर राहावे लागत आहे. मतांच्या राजकारणात माथेरान पिछाडीवर पडले आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे इथली अल्प मतदार संख्या. त्यामुळे भविष्यात सुध्दा भूमिपुत्रांचे संघर्षमय जीवन राहणार की काय असा प्रश्न स्थानिक भूमिपुत्र उपस्थित करत आहेत. यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी किती धावपळ करावी हे त्यांनी स्वतःहून जाणले पाहिजे.