लोढा कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा लोंढा

सकारात्मक चर्चेनंतर कंपनी व्यवस्थापन-शेतकऱ्यांमध्ये झाले एकमत; रस्त्याच्या कामाला मात्र स्थगिती

| नेरळ | कांता हाबळे |

 लोढा कंपनी शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता वळणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. अखेर कंपनी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांमधील हा वाद एका बैठकीनंतर जागेच्या सर्वेक्षणावर येवून थांबला. लोढा कंपनीने शेतकऱ्यांना विचारात न घेता वहिवाटीचा पिंपळोली-सुगवे रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून वळवण्याचा घाट घातल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला होता. यावर कंपनीने शेतकऱ्यांच्या कुठल्याही जागेतून रस्ता जाणार नाही तर जागेचा सर्वे करण्यात येईल. यानंतरच पुढील कामाला सुरूवात होईल, असे एकमत कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत झाले.

कर्जत तालुक्यातील पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीत लोढा या बांधकाम व्यवसायिकाकडून मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान या कंपनीकडून बांधकाम होत असताना येथील वहिवाटीचा तळवडे पिंपळोलीपुढे सुगावा भीमाशंकर रस्ता हा 104 राज्य मार्ग असून पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीत काहीसा रस्ता वळवण्यात येणार असल्याचा आरोप स्थानिक शेतकाऱ्यांनी केला. हा रस्त्या कंपनीने सर्वे नंबर 82 रंगनाथ  भोईर यांच्या सह अन्य पाच जणांच्या मालकीच्या असलेल्या शेतातून वळवला असून त्यासाठी कंपनीने शेतात मार्किंग करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच येथील शेतकरी आक्रमक झाले होते.  यावेळी शेतकरी प्रवीण भोईर यांनी लोढा कंपनीचा सुरू असलेला मनमानी कारभार यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होतो असे सांगत आमच्या शेतातून रस्ता टाकला जात असून कंपनीने साधे आम्हाला विचारलेदेखील नसल्याचा आरोप केला.

शेतकऱ्यांनी लोढा कंपनीविरोधात तहसीलदार यांना अर्ज केला असून नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबाबत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला. दरम्यान तडवडे पिंपळोली सुगवे जाणारा वहिवाटीचा रस्ता कंपनीने वळवण्याचा घाट घातल्याने येथील स्थानिक नागरिक देखील आक्रमक झाले असून यावर काही ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. यामध्ये दीपक कालन या ग्रामस्थानेदेखील कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. कंपनी शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही. जे पाहिजे ते एका रात्रीत रस्ता टाकत आहेत. यावेळी दिलीप शेळके या ग्रामस्थानी देखील कंपनी विरोधात आपले मत व्यक्त केले आहे. वहिवाटीचा सुरू असलेला रस्ता आम्हाला पाहिजे असून यामध्ये कुठलाही बदल करून दिला जाणार नाही, असा सूर ग्रामस्थांनी आळविला होता.

शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमीकडे पाहत लोढा कंपनीचे सुभाष लोणारे व काही अधिकारी यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. दरम्यान यावेळी लोढा कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, कुठल्याही शेतकऱ्यांच्या जागेतून हा रस्ता जात नसून शेतकऱ्यांचे यात कुठलेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी कंपनीने घेतलेली आहे. जो डांबरी रस्ता आहे तो आमच्या जागेत असल्याने यासाठी वरिष्ठ स्तरावर कागदोपत्री व्यवहार करण्यात आला. जे काम सुरू आहे. ते नियमात होणार असून शेतकऱ्यांनादेखील असे वाटत असेल की जागेचा सर्वे करण्यात यावा. त्यासाठी आम्ही तयार असून शेतकऱ्यांनी त्यांच्या नुसार जागेची मोजणी करावी. यासाठी काही मदत लागल्यास ती आम्ही करू, असेही कंपनीकडून सांगण्यात आले. जे काम सुरू आहे ते शेतकऱ्यांच्या समस्या निवारण झाल्यावर पुन्हा एकदा सुरुवात करण्यात येईल, यावर कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये एकमत झाले. एकूणच शेतकरी आणि लोढा कंपनीत झालेल्या सकारात्मक चर्चेत कुठे तरी वाद मिटण्याची शक्यता निर्माण झालेली दिसत आहे.

Exit mobile version