हरिहरेश्वरात ‘खगोल दर्शन महोत्सव’
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) व महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच AstronEra च्या सहकार्याने हरिहरेश्वर येथे ‘खगोल दर्शन महोत्सव 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय International Dark Sky Week निमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांना प्रकाश प्रदूषणाविषयी जागरूक करत ताऱ्यांनी नटलेल्या आकाशाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा उद्देश आहे.
‘प्रकाश म्हणजेच प्रदूषण’ ही संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचवून अंधारातच आकाशातील नैसर्गिक चमत्कार अनुभवता येतात, याची जाणीव करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव 24, 25 व 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत हरिहरेश्वर येथील MTDC रिसॉर्ट परिसरात होणार आहे. याचबरोबर लोणार येथील पर्यटक स्वागत केंद्राजवळ MTDC रिसॉर्ट परिसरात समांतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हरिहरेश्वर येथे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कोणतीही पूर्वनोंदणी आवश्यक नाही. ‘Drop-in’ पद्धतीने नागरिकांना कधीही येऊन सहभाग घेता येणार असून इच्छुकांना स्वतःचे तंबू घेऊन येण्याची मुभा देण्यात आली आहे.
संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत ISRO प्रमाणित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध खगोलशास्त्रीय उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये खगोलशास्त्राची ओळख, इतिहास, दुर्बिणींचे कार्य यांची माहिती देण्यात येणार असून Venus, Jupiter, Moon तसेच Orion यांचे दुर्बिणीतून थेट निरीक्षण करता येणार आहे. याशिवाय ‘Live Sky Storytelling’, ‘Guided Sky Navigation’ आणि खुलं प्रश्नोत्तर सत्र (Q&A) यांचाही समावेश आहे.
या उपक्रमातून नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून आकाश निरीक्षणाची संधी मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी प्रवास, निवास व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. लोणार येथे प्रा. व्यवस्थापक म्हणून योगेश निरगुडे, तर हरिहरेश्वर येथे दीपक माने हे समन्वयक म्हणून कार्य पाहणार आहेत.
पर्यटन विभागाच्या या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून, ‘चला, अविस्मरणीय क्षण अनुभवूया… आकाश सगळ्यांसाठी आहे!’ असा संदेश देण्यात आला आहे.







