एटीकेटीची सवलत केवळ राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाच

New Delhi, India - June 20, 2018: Delhi university aspirants fill their admission forms for the new academic session 2018-19 at Daulat Ram College, in New Delhi, India, on Wednesday, June 20, 2018. (Photo by Sanchit Khanna/ Hindustan Times)

अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाचा निर्णय

| पुणे | प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एटीकेटीद्वारे अकरावीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) अन्य मंडळाचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण असल्यास त्यांना राज्य मंडळात अकरावीला प्रवेशाची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव का, असा प्रश्न करण्यात आला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण बाबींसंदर्भात प्रकटन प्रसिद्ध केले आहे. त्यात एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश देत असताना ही सवलत कोणाला लागू आहे आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नेमका अर्ज कधी करता येईल, या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. राज्यात सीबीएसईसह अन्य मंडळांच्या शाळांतून अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का मोठा आहे. या पार्श्वभूमीवर, एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या मुद्द्याने लक्ष वेधून घेतले आहे.
परिपत्रकानुसार, राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी राज्य शासनाने एटीकेटी सवलत लागू केलेली आहे. ही सवलत केवळ महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळाचा इयत्ता अकरावीमध्ये (इयत्ता दहावी सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत) तात्पुरता प्रवेश दिला जातो. एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची संधी दहावी पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर (साधारणपणे पहिल्या विशेष फेरीनंतर) दिली जाईल.

एटीकेटी सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरता येतील. इंग्रजी विषयात एटीकेटी असेल तरीही भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये विज्ञान शाखा घ्यायची असल्यास दहावीमध्ये विज्ञान विषयात 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनाही त्या मंडळाने पुरवणी परीक्षेची सवलत लागू केली असल्यास ती त्याच मंडळाच्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी लागू असेल. राज्य मंडळातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत लागू होणार नसल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version