बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रेल्वे तिकीट सवलत मिळविण्याचा प्रयत्न

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

कर्करोगी असल्याचे खोटे भासवून रेल्वे तिकीट सवलत मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवाशांकडून अधिक पैसे उकळून रेल्वे प्रशासनाची व शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

रेल्वे तिकीट काढून देणारी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 एप्रिलला सायंकाळी सुमारे 6.10 वाजता पनवेल रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटर क्रमांक 2 येथे हा प्रकार घडला. आरोपींनी कर्करोगी रुग्णांसाठी मिळणाऱ्या रेल्वे सवलतीचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार केले. हे प्रमाणपत्र टाटा मेमोरियल सेंटरच्या अधिकृत कागदपत्रांसारखे भासवण्यात आले होते.

त्यावर संबंधित कर्मचाऱ्याची बनावट सही आणि रूग्णालयाचे बनावट शिक्के देखील मारण्यात आले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली. 30 एप्रिल 2026 रोजी गोल्डन टेम्पल मेल (गाडी क्रमांक 12903) मध्ये बांद्रा टर्मिनस ते अंबाला कॅन्ट या मार्गावर दोन प्रवाशांना कर्करोगी रुग्ण म्हणून दाखवून सवलतीचे तिकीट मिळवून देण्यात आले. प्रत्यक्षात या प्रवाशांकडे चौकशी केल्यावर ते कर्करोगी नसतानाही त्यांच्याकडे बनावट प्रमाणपत्र आढळली.

या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version