रोहे स्थानकातील तिकीट विक्रीच बंद
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
रोहा या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरून कोकणात जाण्याकरिता लोकल तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांची मोठीच कुचंबणा होत आहे. रेल्वे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड आणि त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोनाचा लॉकडाऊन लागल्यापासून ते आजपर्यंत रोहा रेल्वे स्टेशन वरून कोकणात जाण्या-येण्याकरिता लोकल तिकीट प्रवाशांना बंद करण्यात आले आहे. यामुळे मुरुड व रोहा तालुक्यातील दररोज कोकणात प्रवास करणारे नाईलाजाने त्यांना विनातिकीट प्रवास करावा लागत आहे. प्रवास करत असताना गाडीत चुकुन टिसी आला तर आपलं काय होईल ही धास्ती घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. याची माहिती रेल्वे विभागाला असुन सुद्धा लोकल तिकीट का सुरू करीत नाही, गरीब प्रवाशांना दिलासा का दिला जात नाही, हा प्रश्न सर्व प्रवाशांना पडला आहे.
याबाबत काही प्रवाशांसमवेत चर्चा केली असता रोहा तिकीट मागितले तर तिकीट मास्टर सांगतो की, रोहा रेल्वे स्टेशनचे तिकीट मिळत नाही. तुम्हाला रोहा रेल्वेस्टेशन पासून पाच स्टेशन दुरचं तिकीट मिळू शकते. ही तर रेल्वे विभागाची लुट आहे. आम्ही तिकीटाचे पैसे जास्त का भरु, हा प्रश्न या प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
रोहा तिकीट मास्टर यांना विचाराणा केली असता ते म्हणाले की, लॉकडाऊन पासून कोकणात जाण्यासाठी व येण्यासाठी लोकल तिकीट बंद केले आहेत. ते अजुनपर्यंत बंद आहेत. आम्हाला वरिष्ठ अधिकाराने कोकणात जाण्याकरिता लोकल तिकीट सुरू करा असा आदेश दिला तर आम्ही ताबडतोब कोकणात जाण्याकरिता लोकल तिकीट सुरू करू. अशी माहिती यावेळी तिकीट मास्टरनी दिली. परंतु आपल्या रोहा रेल्वे स्टेशनवरून कोकणात जाण्याकरिता लोकल गाड्या व दोन एक्स्प्रेस गाड्या या ठिकाणी थांबल्या जातात, असे यावेळी तिकीट मास्टर कडुन सांगण्यात आले.