माज आणि भीती

आसाममधील हाफ्लांग जिल्हा कालपर्यंत कोणालाही ठाऊक नव्हता. तिथल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे आता त्याला जगात प्रसिध्दी मिळाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना विमानातून उतरवून अटक करण्याचा जो प्रकार गुरुवारी दिल्लीत घडला तो याच कार्यकर्त्यांच्या फिर्यादीच्या आधारे. दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक कधी झाली हे एरवी दिल्लीकरांनाही कळत नसेल. पण गुरुवारी ती देशभर गाजली. आदल्या रात्री सभागृहात राडा झाला. चपलांची मारामारी झाली. भाजपच्या नगरसेवकांनी मतपेटीत पाणी आणि शीतपेये ओतली. भाजप स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणवतो. आपण नेहरूंच्या काँग्रेसपेक्षाही सामर्थ्यवान झालो आहोत असाही त्याचा दावा आहे. पण या पक्षाला एकाच वेळी सत्तेचा माज आणि दुसरीकडे सत्ता जाण्याची भीती यांनी कसे ग्रासले आहे याची ही उदाहरणे आहेत. एकीकडे आपल्याला देशात कोणीही हरवू शकत नाही असं म्हणायचं  आणि दुसरीकडे प्रत्येक क्षणी विरोधक वाढत आहेत की काय असं म्हणून भेदरून राहायचं असं त्याचं चालू आहे. हाती प्रचंड सत्ता केंद्रीत झाल्याने प्रचंड माज येतो. आपण अजिंक्य आहोत असे वाटू लागते. पण त्याच वेळी अगदी बारीकसा पराभव, बारीकशी टीका, लहानसा विरोध सहन होईनासे होतात.
खेडा यांचा गुन्हा काय?
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना मोदी अदानी प्रकरणाबाबत का गप्प आहेत असा सवाल केला. तो करताना त्यांनी मोदींचा उल्लेख नरेंद्र दामोदरदास मोदी याच्याऐवजी नरेंद्र गौतमदास मोदी असा केला. हे आपल्याकडून चुकून झालं असं म्हणून त्यांनी नंतर यावरून माफी मागितली. खेडा यांची सफाई अनेकांना पटेल असे नव्हे. त्यांच्यासारख्या राष्ट्रीय प्रवक्त्याने आणि सध्याच्या वातावरणात बोलताना सावधगिरी बाळगायला हवी यात शंका नाही. मात्र अटक करून त्यांना तुरुंगात टाकावे असे काहीही या वक्तव्यात नाही. पण आधी आसाममध्ये आणि नंतर उत्तर प्रदेशात कोणा भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या भावना दुखावल्या वगैरे कारणे देऊन फिर्यादी दाखल केल्या. मग सामाजिक सलोख्यास बाधा आणली इत्यादी कलमे लावून पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी केली. कहर म्हणजे विशिष्ट धर्माचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न करण्याबाबतचे 295 अ हे कलमदेखील लावण्यात आले. खेडा यांनी जो उल्लेख केला त्यात धर्माचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. पण प्रत्येक गोष्ट ही धर्म आणि धार्मिक भावना यांच्याशी जोडणे हे मोदी राजवटीने विकसित केलेले शस्त्र आहे. त्याचा किती भयानक वापर होतो हे खेडा यांच्या प्रकरणात दिसते. छत्तीसगडमध्ये रायपूरला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी खेडा व इतर नेते निघाले होते. खेडा यांच्या सामानाची अदलाबदल झाल्याचे खोटेच कारण सांगून त्यांना दिल्लीला विमानातून उतरवण्यात आले असा काँग्रेसचा आरोप आहे. नंतर त्यांना तिथे अटक करण्यात आली. रात्री उशिरा काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण उपस्थित केल्यावर खेडा यांना जामीन मिळाला. गेल्या काही वर्षांपासून मोदी यांच्याबाबत जराही काही विरोधी बोलले गेले की अशा तर्‍हेच्या केसेस मागे लावून द्यायच्या ही भाजपची रीत झाली आहे. खेडा यांचे उद्गार हे अभिरुचीला धरून नाहीत असे म्हणता येऊ शकते. मात्र त्यांना 153 ए सारखी भयंकर कलमे लावणे हा दंडेलशाहीचा कळस आहे. आपल्या राजकारणात याहीपेक्षा खालच्या दर्जाची वक्तव्ये रोज केली जात असतात. खुद्द नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या निवडणुकीत दीदी ओ दीदी असे अतिशय हिणकस पध्दतीने ममता बॅनर्जी यांना हिणवण्याचा प्रयत्न केला होता. मनरेगाच्या चर्चेत त्यांनी काँग्रेसची विधवा असा सोनिया गांधीचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता. मोदींच्या सहकार्‍यांनी तर याहीपेक्षा भयंकर विधाने केलेली आहेत. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
अदानीचे काय?
खेडा यांनी अदानीबाबतचा जो मुद्दा उपस्थित केला त्याला बगल देण्यासाठीच भाजपने हा सर्व प्रकार घडवून आणला आहे. अदानी प्रकरण हे जणू काही बाजारातील रुटीन गोष्ट आहे अशा रीतीने भाजपवाले वागत आहेत.  या प्रकरणाशी थेट मोदींचा संबंध जोडणारे आरोप झाले आहेत. तरीही मोदींनी संसदेत याला उत्तर दिले नाही. अदानीवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे असे म्हणण्याचा भाजपचा प्रयत्न पूर्ण फसला आहे. शेअर बाजारातील गुजराती व मारवाडी देशभक्त शेअर दलालांनी भाजपचा दावा उडवून लावला आहे. बाजारात पैसा हाच  मोठा धर्म असतो. त्यामुळे अदानीच्या कंपन्यांचे शेअर विक्रमी रीतीने घसरले आहेत. एलआयसीची अदानीतील तीस हजार कोटींची गुंतवणूक गुरुवारी तोट्यात गेल्याचे निष्पन्न झाले. एवढे होऊनही अदानी सोडाच पण त्याच्या कंपनीतल्या शिपायाचीही साधी चौकशी सीबीआय, इडी यांनी केलेली नाही. सेबी चौकशी करते आहे असे म्हणतात. मात्र ती कोणत्या मुद्द्यांवर आहे आणि तिचा अहवाल कधी येणार हे कोणालाही ठाऊक नाही. उलट, या प्रकरणाच्या बातम्या द्यायला बंदी घालावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याचा शुक्रवारी प्रयत्न झाला. न्यायमूर्ती तो उडवून लावतील अशीच अपेक्षा होती व तसेच झाले. गंमत अशी आहे की खेडा यांनी गैरउद्गार काढल्यामुळे आसामपासून उत्तर प्रदेशापर्यंतच्या भाजप कार्यकर्त्यांची मने दुखावली. पण दिल्ली महानगरपालिकेत बुधवारी जी हाणामारी, शिवीगाळ झाली त्यामुळे मात्र एकाही देशभक्त भाजपवाल्याला वाईट वाटलेले दिसत नाही. दिल्ली महापालिका आपने जिंकल्यापासून भाजप चवताळला आहे. गेल्या दोन-तीन बैठकांमध्ये प्रचंड राडा झाल्याने महापौराची निवडणूक होऊ शकली नाही. स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो हे ठाऊक असूनही भाजपने यावर कोर्टबाजी करण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाल्यावर आता स्थायी समिती ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे. एरवी, मोठमोठी तत्वांच्या गप्पा मारणार्‍या देशातल्या बलाढ्य पक्षाचे हे रुप केविलवाणे आहे.

Exit mobile version