गतिमंद मुलांनी बनविल्या आकर्षक राख्या

| उरण | वार्ताहर |

भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. बहिणीची रक्षा करणे ही जबाबदारी भावाची असते. रक्षाबंधन सण बुधवार, दि.30 रोजी आहे. यानिमित्ताने उरण शहरातील उरण नगरपरिषदेच्या स्वातंत्र्यसैनिक दत्ता रहाळकर मैदान बोरीजवळ असलेल्या स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचलित सीबर्ड (स्वीकार) असलेल्या या विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी रक्षाबंधन सणासाठी रंगीबेरंगी राख्या बनविल्या आहेत.

उरण येथील शाळा, सेवाभावी संस्था त्या राख्या खरेदी करून या मुलांना नेहमीच मदत करीत आहेत. राख्यांचे अनेक प्रकार आहेत. गोंडा राखी, खड्यांची राखी, मोत्यांची राखी, असे प्रकार आहेत. तीन रुपयांपासून त 25 रुपयांपर्यंत राख्या येथे उपलब्ध आहेत. या राख्या यूईएस शाळा, सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल उरण, उरण कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, लिटील मास्टर, डॉ. गाडे मॅडम व पालक खरेदी करून मदत करीत आहेत.

शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश म्हात्रे, मानसी पांचाळ, पल्लवी परदेशी, साक्षी दांडेकर, प्रशांत कदम, गणेश जाधव, अस्मिता भोईर आदी शिक्षक मुलांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत.

Exit mobile version