| पनवेल | वार्ताहर |
खारघर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त झालेली वाहने व बेवारस वाहनांचा शासकीय पद्धतीने शुक्रवार, दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता लिलाव होणार आहे.
खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी सात दिवसांच्या आत ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. 86 वाहनांतून 67 वाहने शिल्लक आहेत. यातून काही गाड्या मूळ मालकास देण्यात आल्या आहेत. खारघर पोलीस ठाण्यात पडून असलेल्या 67 वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी व मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानुसार वाहनांची शासकीय नियमानुसार तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या परवानगीने लिलाव करून येणारी रक्कम शासन जमा करण्यात येईल. ज्यांना लिलावामध्ये भाग घ्यावयाचा आहे, त्यांनी खारघर पोलीस ठाणे येथे लेखी आवेदन देण्यात यावे. तसेच लिलावात सहभाग घेणार्यांनी अनामत रक्कम 75 हजार रुपये पोलीस ठाण्यात जमा केल्यावर लिलावात सहभाग होता येईल. त्याचबरोबर लिलाव वाहनांमध्ये ज्यांची वाहने चोरी झाली असतील किंवा मिळून येत नाहीत त्यांनी येऊन वाहनांची खात्री करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी केले आहे.