साई पार्क इमारतीचे मनपाकडून ऑडिट

| पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेल येथील सेक्टर 12 मधील साईपार्क इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या स्लॅब तिसर्‍या मजल्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यामुळे सदर इमारत रहिवाश्यांना राहण्यास योग्य आहे की धोकादायक आहे, हे येत्या दोन ते तीन दिवसांनी अहवाल प्राप्त होताच स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तोपर्यंत पालिकेच्या सूचनेनुसार साई पार्क इमारतीमधील रहिवाश्यांचे दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

भाऊबीजेच्या रात्री नवीन पनवेल सेक्टर 12 मधील साई पार्क इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली होती. चौथ्या मजल्यावरील 404 या फ्लॅटमधील हॉलचा भाग पूर्णपणे तुटून तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटवर कोसळला. यावेळी चौथ्या मजल्यावरील एक 75 वर्षीय वृद्ध व्यक्ती स्लॅबसकट तिसर्‍या मजल्यावरील घरामध्ये खाली कोसळले. त्यामुळे या धक्क्याने सदर व्यक्ती त्याठिकाणी निपचित पडले. सदरची दुर्घटना समजताच साई पार्क इमारतीचे सेक्रेटरी रमेश म्हात्रे यांनी जीवाची पर्वा न करता चौथ्या मजल्यावरील कोसळलेल्या फ्लॅट मधून तिसर्‍या मजल्यावर उतरून सदर वृद्ध व्यक्तीला बाहेर काढले.

या दुर्घटनेचे वृत्त समजताच पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार प्रभाग समिती ‘ड’ चे प्रभाग अधिकारी अमर पाटील, अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव यांच्यासह कर्मचारी आदींनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. आणि सर्व परिस्थितीचा आढावा घेतला व इमारतीमधील सर्व रहिवाश्यांना सुखरूपपणे इमारतीबाहेर काढले. त्याचबरोबर सद्यस्थितीत अशा ठिकाणी न राहता अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचनाही केल्या. याबाबत पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी इमारतीतील रहिवाश्यांना मोलाचे सहकार्य केले.

चौथ्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब तुटून तिसर्‍या मजल्यावर पडल्यामुळे तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटला हादरा बसून कमकुवत झाला आहे. परिणामी इमारतीच्या आजूबाजूच्या बांधकामाला धक्का बसला असून सद्यस्थितीत इमारतीची डागडुजी पूर्ण होईपर्यंत राहणे धोक्याचे आहे. ह्या धर्तीवर पालिकेच्या वतीने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून इमारत राहण्यायोग्य आहे की नाही याबाबत अहवाल प्राप्त होईपर्यंत रहिवाश्यांनी त्याठिकाणी अशा परिस्थितीत न राहता दुसर्‍या ठिकाणी राहावे याकरिता पालिकेच्यावतीने सर्व रहिवाशांंना आवाहन करण्यात आले आहे.

सदर दुर्घटनेचे वृत्त समजताच आयुक्त गणेश देशमुख सरांच्या सूचनेनुसार घटनास्थळी धाव घेतली. सर्व परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. सदर इमारत राहण्यायोग्य आहे की नाही ते तपासण्यासाठी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाश्यांना तोपर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे यासाठी सर्व रहिवाश्यांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार इमारतीतील सर्व रहिवाश्यांनी सहकार्य करून आवाहनाला प्रतिसाद दिला दिसुन इमारत पूर्णपणे खाली केली असून इतर ठिकाणी राहण्यास गेले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

अमर पाटील
प्रभाग अधिकारी
Exit mobile version