ऑस्ट्रेलियाचा विजयी चौकार

षटकारांच्या जुगलबंदीत ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 5 धावांनी विजय

| धरमशाला | वृत्तसंस्था |

हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथल्या हिमालयाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर अवघ्या पाच धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने रचीन रवींद्रचं शतक आणि जेम्स नीशामचं अर्धशतक यांच्या वादळी खेळीच्या बळावर विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 19 धावांची आवश्यकता होती. पाचव्या चेंडूवर नीशाम बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर झाला. या सामन्यात 65 चौकार आणि 32 षटकार पाहायला मिळाले.

प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग जोडीने 61 धावांची सलामी दिली. जोश हेझलवूडने कॉनवेची खेळी संपुष्टात आणली. पाठोपाठ विल यंगलाही त्यानेच तंबूत धाडलं. यानंतर डॅरेल मिचेल आणि रचीन रवींद्र जोडीने 86 चेंडूत 96 धावांची वेगवान भागीदारी केली. झंपाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा मिचेलचा प्रयत्न मिचेल स्टार्कच्या हातात जाऊन विसावला. कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलीप्स झटपट बाद झाले पण रचीन रवींद्रने फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याच्या शतकामुळेच न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित राहिल्या. रवींद्रने 77 चेंडूत शतक पूर्ण केलं. वर्ल्डकप स्पर्धेतलं त्याचं हे दुसरं शतक आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने रवींद्रला बाद केलं. त्याने 9 चौकार आणि 5 षटकारांसह 116 धावांची खेळी केली. रवींद्र बाद झाल्यानंतर नीशामने सूत्रं हाती घेतली. सँटनरने 12 चेंडूत 17 धावा करत त्याला चांगली साथ दिली. नीशामने 39 चेंडूत 58 धावा करत न्यूझीलंडला जिंकून देण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या शतकांच्या बळावर 388 धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाचा संघ एकाक्षणी 24 षटकात 200 अशा सुस्थितीत होता मात्र त्यानंतर त्यांची धावगती मंदावली आणि फलंदाजही गमावले. चार चेंडू शिल्लक असतानाच त्यांचा डाव 388 धावांवर आटोपला. वॉर्नर-हेड जोडीने चौकार, षटकारांची लयलूट करत 175 धावांची सलामी दिली. ग्लेन फिलीप्सने वॉर्नरला 81 धावांवर बाद केलं. त्याने 5 चौकार आणि 6 षटकारांसह 65 चेंडूत 81 धावा केल्या. दुसरीकडे दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हेडने किवी गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या 59 चेंडूत शतक पूर्ण केलं. हेडचा हा पहिलाच वर्ल्डकप आहे.विश्वचषक पदार्पणात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्याने खणखणीत शतक साजरे केले . फिलीप्सनेच हेडचा अडथळा दूर केला. त्याने 10 चौकार आणि 7 षटकारांसह 67 चेंडूत 109 धावांची खेळी केली. यानंतर ऑस्ट्रेलियाने नियमित अंतरात फलंदाज बाद झाले . यामुळेच त्यांना 400 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ग्लेन मॅक्सवेल (41), जोश इंगलिस (38), पॅट कमिन्स (37) यांनी उपयुक्त खेळी केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन फिलीप्स यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले .

ऑस्ट्रेलियाने धावांचा इमला उभा करताना विक्रमांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मिळून 20 षटकार लगावले. वनडेतला हा विक्रम आहे. सलग तीन सामन्यात 350 पल्याड धावसंख्या उभारण्याचा नवा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या संघाने केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 षटकात 118 धावा लुटल्या. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात कॅमेरुन ग्रीनला वगळून ट्रॅव्हिस हेडला खेळवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने मार्क चॅपमनऐवजी जेम्स नीशामला खेळवले.

Exit mobile version