। पेण । वार्ताहर ।
नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने प्रयोगशील शेतकरी दयानंद पाटील यांच्या मत्स्यशेतीच्या बाजूने खारबंदिस्ती खाडीच्या बाजूने घसरत असल्याने मोठ्या प्रमाणात त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी वारंवार ठेकेदाराला अर्ज विनवण्या करूनदेखील ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर ठेकेदाराच्या या त्रासाला कंटाळून दयानंद यांनी 19 मे रोजी पेण तहसीलदार यांना केलेल्या निवेदनामध्ये कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला. आत्मदहनाचा इशारा देताच सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि बहिरम कोटक येथे दयानंद पाटील यांच्या मत्स्यशेतीच्या बाजूने झालेल्या बंदिस्तीमुळे काय प्रकार झालेला आहे, याची पाहणी केली.
घटनास्थळी कनिष्ट अभियंता दादासाहेब सोनटक्के पोहोचले. त्यावेळी त्यांना दयानंद पाटील यांच्या मत्स्यशेतीच्या बाजूने खारबंदिस्ती तीन लेअरनी (थर) खाडीत सरकलेली दिसली. तसेच मधुकर बनकर नामक ठेकेदाराचा सुपरवायझर शेतकर्याला दमदाटी करत असल्याचे दयानंद यांनी सोनटक्के यांच्या निदर्शनास आणले. तसेच यावेळी दयानंद यांनी सांगितले की, याअगोदर मी माझ्या शेतीतून बंदिस्ती करण्यासाठी शासनाला परवानगी दिली आहे. परंतु, हेतुपुरस्सर ठेकेदाराची माणसे मला त्रास देण्याच्या दृष्टीने सर्व कारवाई करीत आहेत. दादासाहेब सोनटक्के यांनी दयानंद यांचे सर्व बोलणे ऐकून घेऊन येत्या दोन दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सोनटक्के यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, सदरील खारबंदिस्ती तीन थरामध्ये खाडीच्या बाजूने सरकली असून, ही बंदिस्ती तातडीने दुरूस्ती केली जाईल. तसेच दयानंद पाटील यांचे दरवेळेला आम्हाला सहकार्यच असते, त्यांच्यावर अन्याय होणार नाही. यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असणार आहोत. जो त्रास आमच्यामुळे झाला आहे, त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच येत्या दोन दिवसांत सरकलेल्या खारबंदिस्तीवर दोन्ही बाजुनी लाकडी मुंड्यांच्या सहाय्याने बांधणी करून लोखंडी बारच्या सहाय्याने योग्यप्रकारे बांधाचे काम केले जाईल. परंतु, खारबंदिस्तीचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याची विचारणा केल्यावर त्यावर उत्तर देणे सोनटक्के यांनी टाळले.
खारबंदिस्तीच्या कामाची ऐशीतैशी
खारबंदिस्तीचे काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचे केले असून, येत्या पावसाळ्यात कित्येक ठिकाणी खांडी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, अंदाजत्रकानुसार खारबंदिस्तीचा वरचा माथा हा तीन मीटर रुंदीचा असणे गरजेचे आहे व वरच्या माथ्यावर एक फूट मुरूमाचा थर देणे, खाडीच्या बाजूने संपूर्ण दगडी पिचींग तसेच शेतीच्या बाजूने पायथ्यापासून वरच्या दिशेने दीड मीटर अंतर सोडून दगडी पिचींग करणे. असे असताना कोणत्याही प्रकारचा अंदाजपत्रकाच्या अटी व शर्तींचे पालन न करता हे काम केल्याने पावसाळ्यात या खारबंदिस्तीची अवस्था बिकट असणार आहे.