टोलनाक्यांवर स्वयंचलिक प्लेट रिडर कॅमेरे; गडकरींची घोषणा

। मुंबई । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके बंद करून त्याऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसवण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यासाठीचा चाचणी प्रकल्प सुरू करण्यात आला असून यासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

चारचाकी गाड्यांमध्ये कंपनीने फीट केलेल्या नंबरप्लेट बसवण्याचा निर्णय 2019 मध्ये केला होता. त्यानुसार गेल्या चार वर्षात आलेल्या चारचाकी गाड्यांना या नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत. आता टोलनाके काढून स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसवण्यात येणार आहे. हे कॅमेरे गाडीच्या नंबरप्लेटवरील नंबर वाचून त्याला जोडण्यात आलेल्या बँक खात्यातून पैसे वजा करतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, या योजनेचा चाचणी प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, यात काही त्रुटी आहेत. जर वाहन चालकाने कॅमेरा चुकवण्याचा प्रयत्न केला किंवा बँक खात्यात पैसे नसेल, तर त्याबाबत काय शिक्षा असेल, यासंदर्भात कायद्यात सुधारणा कराव्या लागतील. तसेच ज्या गाड्यांना या विशिष्ट नंबर प्लेट नसतील त्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी नियम करावे लागतील. यासाठी कायदा आणावा लागेल.

सद्यस्थितीत 40 हजार कोटींच्या एकूण टोल वसूलीपैकी 97 टक्के रक्कम फास्टटॅगद्वारे होत आहे. उर्वरित 3 टक्के रक्कम सामान्य टोल दरांपेक्षा जास्त पैसे देणार्‍याकडून येते. फास्टटॅग लावल्यास टोल प्लाझा ओलांडण्यासाठी एका वाहनाला सुमारे 47 सेकंद लागतात, असेही ते म्हणाले.

कॅमेरे कसे काम करतात?
भारतातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके हटवून त्या जागी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसवण्याची सरकारची योजना आहे. हे कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेट्स वाचतील आणि वाहन मालकाने नंबर प्लेटला जोडलेल्या बँक खात्यातून पैसे वजा करण्यात येतील. या योजनेमुळे टोलनाक्यांवर होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, ही योजना कशाप्रकारे अंमलात आणली जाते, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

Exit mobile version