| मुंबई | प्रतिनिधी |
आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार देखील फुटले आहेत. लोकसभेत ठाकरेंचे 9 खासदार असून, ऑपरेशन टायगर लक्षात घेता उद्धव ठाकरेंकडून सर्व खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला 9 पैकी केवळ 3 खासदार उपस्थित राहिले. त्यामुळे ठाकरेंची अडचण वाढली असून, गेल्या 3 महिन्यांत 3 पक्षांचे खासदार फुटले आहेत.
मोदी सरकारकडून दि.17 एप्रिल रोजी महिला आरक्षण सुधारणा विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. त्या आडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. परंतु, इंडिया आघाडीने एकत्र राहून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. घटना दुरुस्ती विधेयक असल्याने विधेयकाच्या बाजूने दोन तृतीयांश मतदान गरजेचे होते. मात्र, विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर 230 मते विरोधात गेली. त्यामुळे दोन तृतीयांश बहुमतासाठी 362 चा आकडा आहे. तीन जागा रिक्त असल्याने बहुमताचा आकडा 360 वर येतो. 17 एप्रिल रोजी मतदान झाले, तेव्हा 12 खासदार अनुपस्थित राहिले. त्या दिवशी 528 खासदार हजर होते. त्यांनी मतदान केले. तेव्हा दोन तृतीयांश मतदानासाठी 352 चा आकडा गरजेचा होता. परंतु, सत्ताधाऱ्यांना 298 मते मिळवता आली. म्हणजेच 54 मते कमी पडली. लोकसभेत एनडीएचे संख्याबळ 314 वर पोहोचले आहे. तृणमूलचे 20 खासदार फुटल्याने एनडीएचा आकडा 300 च्या पुढे गेला. आता 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याने हाच आकडा 320 वर पोहोचला आहे.







