ग्रामस्थांची पंचायत समितीकडे तक्रार
| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील भानंग येथील बौद्धवाडी ते नदीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 5 लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात संबंधितांनी पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बौद्धवाडी ते नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासकामासाठी जनसुविधा योजनेतून 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम न करता केवळ बनावट माहितीचा फलक उभारून निधी खर्च झाल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणात संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहाणी करून मंजूर निधीचा वापर नेमका कुठे आणि कसा करण्यात आला, याची सखोल चौकशी करावी. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अपहार झालेला निधी वसूल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात संबंधित कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पंचायत समिती प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, चौकशीनंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. ग्रामस्थांनी मात्र या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी कायम ठेवली आहे.
भानंग ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समिती कार्यालयात निवेदन देत निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नसल्याचे सांगितले आहे. तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्याकडे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सुनिल गायकवाड,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती तळा






