आवळी भोजनाला महिलांची पसंती

| माणगाव । वार्ताहर ।

भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावली नंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ असून या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते.

सध्या या प्रथेचा कालावधी सुरू असून अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. या प्रथेनुसार कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमेच्या कालावधीत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आरती करून झाडाला नैवैदय दाखवितात व सर्वजण एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतात. कुटुंबातील सर्व नातेवाईक, मित्रपरिवार या खास भोजनासाठी उपस्थित असतात. अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची ही परंपरा आधुनिक काळातही पाळली जाते. या निमीत्ताने आप्त परिवार एकत्रित भोजनाचा व सामूहिक आनंदाचा अनुभव घेताना दिसत आहेत.

कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाला बहर येतो. आवळ्याच्या झाडाची पूजा झाल्यानंतरच आवळा खायला सुरुवात करण्याची पद्धती आहे. आवळ्यावर वात लावून झाडाची ओवाळणी केली जाते. यानिमित्ताने परिवारातील सर्व सभासद एकत्रित येऊन आनंद घेतात असे माणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या मंगल मेहता यांनी सांगितले.

Exit mobile version