दोन कोटी 17 लाख 34 हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता
। अलिबाग । प्रमोद जाधव |
जूलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन हजार 324.23 हेक्टर क्षेत्र बाधीत होऊन सात हजार 824 शेतकर्यांना त्याचा फटका बसला आहे. शासनाकडून नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची आशा शेतकर्यांना होती. मात्र, अजूनपर्यंत शेतकर्यांना भरपाई मिळाली नसल्याची माहिती समोर येत आहे. शासनाकडून दोन कोटीहून अधिक रुपयांचा निधी आवश्यक असून शेतकर्यांना भरपाईची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार एन्ट्री मारली. 7 जूलै पासून सुरु झालेला पाऊस जूलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 26 जूलैपर्यंत सुरुच राहिला. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातदेखील जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. वादळी वार्यासह झालेल्या अतिवृष्टीत भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भाताची रोपे पाण्यात कुजून गेली. शेत जमीन पाण्याने तुडूंब भरून गेली होती. काही रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसला.
जूलै व ऑगस्टमध्ये भातशेती, जिरायती शेतीसह दोन हजार 324.23 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. 664 गावांतील सात हजार 825 शेतकर्यांची मोठी हानी झाली. त्यामध्ये जूलै महिन्यात 573 गावांमधील सहा हजार 879 शेतकर्यांच्या दोन हजार 194.72 हेक्टर तसेच ऑगस्टमध्ये 39 गावांमधील 147 शेतकर्यांच्या 55.23 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.
कृषी विभाग, जिल्हा परिषद व महसूल विभागाच्या कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्यांचा अहवाल कृषी विभागाने तयार करून शासनाला पाठविला. मात्र, अजूनपर्यंत शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी शेतकर्यांना अतिवृष्टीचा फटका बसत आहे. परंतु, शासनाकडून नुकसानीची तातडीने अंमलबजावणी होत नाही. नुकसानीसाठी वाट पहावी लागत असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे. रायगड जिल्हयामध्ये 98 हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीचे असून आंब्याचे क्षेत्र सुमारे 14 हजार हेक्टर आहे. भातशेतीसह फळ बाग लागवडीवर शेतकरी भर देतात. मात्र त्यांच्या नुकसानीचा मोबदला देण्यास सरकार उशीर का करीत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जूलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.
नुकसानीवर दृष्टीक्षेप
महिना - गावे - शेतकरी बाधीत क्षेत्र
जूलै - 625- 7678 - 2 हजार 269 हेक्टर
ऑगस्ट - 39 - 147 - 55.23 हेक्टर
एकूण - 664 - 7825 - 2324.23 हेक्टर