राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; पालीकरांना ‘मोरूची मावशी’ची मेजवानी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने पाली येथे चौदाव्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यमहोत्सवात राज्याच्या विविध भागांतून व्यावसायिक तसेच होतकरू कलाकार सहभागी होणार असून, नाट्यरसिकांसाठी ही एक मोठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. यंदाच्या स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन याबाबत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.18) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला प्रकाश देसाई, शांताराम सोनार, विक्रम काटकर, संतोष भोईर, मयूर कारखानीस, आरिफ मनियार, आलाप मेहता, दत्तात्रेय सावंत, मिलिंद सातूर्डेकर, सुनील तिरमिले, हिमांशू शहा, आशिष हजारे, सुहास लोखंडे आणि ऋषिकेश पिंपळे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या रंगभूमीला नवे कलाकार देणारा आणि ग्रामीण भागात नाट्यसंस्कृती रुजविणारा हा उपक्रम यंदाही पालीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील आणि राज्यभरातील नाट्यप्रेमींनी 18 ते 24 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या एकांकिका स्पर्धांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धांना पाली येथील ग. बा. वडेर हायस्कूलच्या रंगमंचावर दररोज सायंकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सलग सात दिवस चालणाऱ्या या नाट्यमहोत्सवात विविध विषयांवरील एकांकिका सादर केल्या जाणार असून, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी जीवनाचे विविध पैलू रंगभूमीच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडणार आहेत. तसेच, या सात दिवसीय नाट्यमहोत्सवाची सांगता विशेष आकर्षणाने होणार आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ‘मोरूची मावशी’ या लोकप्रिय नाटकाचा खास नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे एकांकिका स्पर्धेसोबतच रसिकांना दर्जेदार नाट्यप्रयोगाचा आनंदही घेता येणार आहे.
तसेच, या स्पर्धेत ठेवण्यात आलेली भरघोस पारितोषिके ही या स्पर्धेचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. यावेळी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या एकांकिकेला तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील सर्वोत्तम एकांकिकेसाठी 15 हजार रुपये आणि लक्षवेधी एकांकिकेसाठी 15 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच, सुधागड तालुक्यातील एकांकिकांनाही विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार असून, उत्कृष्ट अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना यांसह विविध कलात्मक विभागांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील नवोदित कलाकारांसाठी आपले अभिनयकौशल्य आणि नाट्यप्रतिभा सिद्ध करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रकाशभाऊ देसाई आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य, मार्गदर्शन आणि पाठबळ लाभत असल्याची माहिती कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष वेत्रवान गुरव, उपाध्यक्ष अभिजीत चांदोरकर, सहसचिव सचिन मोरे, निंबाजी गिते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे राज्याच्या विविध भागांतून तसेच राज्याबाहेरून येणाऱ्या व्यावसायिक आणि होतकरू कलाकारांच्या निवासासह आवश्यक व्यवस्थेची जबाबदारीही प्रतिष्ठानच्यावतीने योग्य प्रकारे पार पाडली जाते. त्यामुळे कलाकारांना आपल्या कलेवर लक्ष केंद्रित करता येते.






