| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी येथे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात प्लास्टिकमुक्त आणि जलसमृद्ध वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीवर्धन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजू किरवे यांच्या हस्ते नाविन्यपूर्ण बर्तन बँक आणि जलतारा कामाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला.
गावात कार्यक्रमांच्या किंवा घरगुती समारंभाच्या निमित्ताने होणारा प्लास्टिक आणि थर्मोकोलच्या डिस्पोजेबल वस्तूंचा वापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी बर्तन बँक (भांडी बँक) उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे गावात प्लास्टिकमुक्त गावाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच, “पाण्याचा एकच नारा, जलतारा-जलतारा” या घोषणेसह भूजल पुनर्भरण व जलसंधारणासाठी जलतारा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. “पाण्याचे थेंब अन् थेंब जमिनीत मुरवूया, भूजल पातळी वाढवूया” या धोरणांतर्गत भविष्याची सुवर्णसंधी साधत हा उपक्रम राबवला जात आहे. गावातील पाण्याचे स्रोत बारमाही टिकवून ठेवण्यासाठी आणि उन्हाळ्यातील टंचाईवर मात करण्यासाठी हा जलतारा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमावेळी सरपंच आदित्य कासरुंग, उपसरपंच सुभाष उजळ, निखील कदम, चांदणी कासरूंग, तनिषा आब्रसकर, आत्माराम रहाटवळ, विशाखा उजळ, श्रेया रहाटवळ, ग्रामपंचायत अधिकारी अभिजीत माने आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






