| पुणे । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे उपस्थित होते. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
“लोकमान्य टिळकांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो”. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. अशी मराठीतून नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली आणि पुणेकरांनी जल्लोष केला. तसेच, लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
ज्या पुरस्काराच्या नावात ‘गंगा’ आहे तो पुरस्कार “नमामि गंगे” यासाठी अर्पण करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केली. महात्मा गांधींनीसुद्धा टिळकांना नव्या भारताचा निर्माता म्हटलं आहे. त्यांनी समाजाला जोडण्यासाठी गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सावाला सुरूवात केली. टिळकांमध्ये युवकांमधील प्रतिभा शोधण्याची जी दिव्य दृष्टी होती याची प्रचिती वीर सावरकरांशी जोडलेल्या एका किस्स्यामध्ये असल्याचं मोदी म्हणाले.