सुनील ठाकूर यांना पुरस्काराने सन्मानित

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील सानेगावचे सुपुत्र तथा तालुका कुणबी समाजाचे माजी सरचिटणीस सुनील ठाकूर यांना छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवराय फुसाम्बु ब्रिगेड, भगवा फाऊंडेशन, निर्मिती विचारमंच धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही भारतीय महिला मंच यांच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने भरलेल्या पहिल्या छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेमध्ये महाराष्ट्रातील 21 मान्यवरांना छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार-2023 देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातर्फे सुनील हरिभाऊ ठाकूर यांना मानाचा फेटा, सन्माचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके देऊन गौरविण्यात आले आहे.

समाजात गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या सुनील ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रा. किसनराव कुरहाडे, भारत लाटकर, अनिल म्हमाणे, डॉ. शोभा चाळके, सुधीर नलावडे, नितेश कुराडे, मोहन मिरजेकर, लता पुजारी, डॉ. ननावरे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सुनील ठाकूर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सानेगाव ग्रामस्थ, तालुका कुणबी समाज व जय भवानी पतपेढीचे सर्व संचालक मंडळ व सदस्य तसेच छत्रपती शिवाजी नगर वसाहत आंबेवाडी कोलाड येथील रहिवाशांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version