सायबर क्राइमबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती

अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत येथील अभिनव ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालयमध्ये कर्जत पोलीस ठाणे आणि रायगड चाइल्ड लाइन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर जागृती व चाइल्ड लाइन मोफत सेवा या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे, अभिनव प्रशालेचे उपप्राचार्य योगेश्‍वर निकम, रायगड चाइल्ड लाईनचे जगदीश दगडे, समुपदेशक रेखा भालेराव, माधुरी माळी, दाभाडे, वैजयंता श्रीखंडे आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक के.डी कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी विविध प्रकारचे सायबर गुन्हे कसे घडतात? त्याची माध्यमे कोणती? आपल्या मोबाइलचा उपयोग किती आणि कसा करावा? विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? याबाबत कोणते कायदे आहेत? तक्रार करताना कोणत्या समस्या निर्माण होतात? तक्रार वेळेत करणे कसे महत्वाचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यासाठी आवश्यक टोल फ्री क्रमांक 112 बाबत माहिती दिली.

ठाणे अंमलदार आकाश राठोड यांनी विद्यार्थ्यांना फोन ट्रॅकिंग मशीन कशाप्रकारे कार्य करते? त्यात कोणती माहीती मिळते याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले. दिशा केंद्राचे रेखा भालेराव यांनी रायगड चाइल्ड लाइनबाबत माहिती दिली तर समुपदेशका वैजयंती श्रीखंडे आणि माधुरी माळी यांनी चांगला स्पर्श, वाईट स्पर्श आणि वाढत्या वयोमानानुसार होणारे शारीरिक, मानसिक बदल याबाबत विद्यार्त्यांना माहिती दिली. तरुण वयात आपल्या हातातून घडणार्‍या चुका आणि त्यासाठी घ्यायची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी रायगड चाईल्ड लाईनचा टोल फ्री क्रमांक 1098 चे कार्य प्रत्यक्ष फोन लावून समजावून सांगितले. त्यावेळी एका विद्यार्थिनीने प्रत्यक्ष फोनवरून रायगड चाइल्ड लाइनविषयी माहिती जाणून घेतली आणि त्याबाबतचे अनुभव स्वतःच्या शब्दात समजावून सांगितले.तारुण्याच्या उंबरठ्यावर असणार्‍या पौगंडावस्थेतील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हवालदार प्रशांत देशमुख, महिला हेड कॉन्स्टेबल संजीता सानप, अभिनवच्या विज्ञान विभागाच्या प्राध्यापिका चव्हाण, प्रा. प्रमोद पाटील, प्रा. दिलीप जाधव यांनीदेखील मार्गदर्शन केले.

Exit mobile version