जिल्हा रुग्णालय, इपिलेप्सी फाऊंडेशनचा पुढाकार
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय व इपिलेप्सी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात इपिलेप्सी, आकडी, अपस्मार (फेफरे/फिट) आजारांविषयीच्या जनजागृती शिबिराचे आयोजन रविवार, 3 जुलै रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इपिलेप्सी फाऊंडेशन, मुंबईचे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या व जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी डॉ. सायली, पी.पी.पी कॉर्डीनेटर, एन.एच.एम, मुंबई तसेच आशिष बनसोडे, पी.पी.पी. कॉर्डीनेटर, डी.डी. ऑफिस, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सी.एम.ई.च्या वेळी डॉ. सूर्या यांनी आपल्या भाषणात फाऊंडेशनचा हा 96 वे शिबीर असून, या शिबिराच्या माध्यमातून इपिलेप्सी म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते याची जनजागृती करण्यात येऊन या आजारांवरील योग्य औषधोपचार मोफत पुरविले जात असल्याचे सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, निर्मल सूर्या व त्यांच्या सर्व टीमचे स्वागत केले व रुग्णांना दिलेल्या औषधांबाबत व पुरविलेल्या सेवेबाबत त्यांचे आभार मानले. या शिबिराच्या माध्यमातून इपिलेप्सीच्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी न्यूरॉलॉजिस्ट किंवा इपिलेप्टॉलॉजिस्ट (अपस्मार चिकित्सक) कडून एकूण 145 रुग्णांची तपासणी, निदान व उपचार करण्यात आले.