| महाड | प्रतिनिधी |
जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी मगर संवर्धन व वन्यजीव जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिस्केप संस्था, महाड वनपरिक्षेत्र कार्यालय, वनविभाग रोहा तसेच प्रिव्ही आणि प्रीजीव स्पेशालिटी लिमिटेड, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
महाड शहरालगत वाहणाऱ्या सावित्री नदीमध्ये इंडियन मार्श क्रोकोडाइल (मगर) या जातीच्या मगरी आढळतात. नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणांमुळे काही वेळा या मगरी मानवी वस्तीजवळ दिसून येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र, मगरींबाबत वैज्ञानिक माहिती व संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मगरींची जीवनशैली, अधिवास, पर्यावरणीय महत्त्व तसेच वन्यजीव संरक्षणाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. लहान वयातच वन्यजीवांबद्दल योग्य माहिती मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये संवर्धनाची जाणीव निर्माण होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नील बनसोडे व शिक्षकवृंद यांनी सिस्केप संस्थेचे सदस्य प्रेमसागर मेस्त्री, गणेश खातू, प्रणव शेलार आणि विराज पाटील यांचे स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांपासून सिस्केप संस्थेमार्फत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संवर्धनासंदर्भातील विविध उपक्रम राबविले जात आहेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विषय शिक्षिका स्नेहल गणेश खातू यांनी केले.







