। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात विकासाचे वारे वाहू लागले असले तरी कर्जत तालुका आजही कुपोषणाच्या विषयी संवेदनशील समजला जातो. या तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी युनायटेड वे ही स्वयंसेवी संस्था गेली दहा वर्षे काम करीत आहे. कुपोषण निर्मूलनासाठी या संस्थेकडून अंगणवाडीत येणार्या तीन ते चार हजार बालकांना दरवर्षी पोषण आहार दिला जातो. आता या संस्थेने कुपोषण बाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य द्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
कर्जत तालुक्याच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये युनायटेड वे मुंबई अंतर्गत स्वयंसिद्धा प्रकल्प राबविला जात आहे. या संस्थेच्या वतीने पथनाट्यातून कुपोषण मुक्ती विषयक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. युनायटेड वे मुंबई व स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अंगणवाडी केंद्र असलेल्या ठिकाणी जावून पथनाट्य केली जात आहेत. या उपक्रमासाठी युनायटेड वे मुंबईचे रेखा जाधव, कल्पेश अगिवले, प्रवीण खंडवी, अर्चना पाटील, प्रतिक्षा ठोंबरे, वासंती बडेकर, तपस्वी नंदकुमार गोंधळी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या पथनाट्यात प्रतीक कोळी, मल्लिनाथ जामदार, सुचित जावरे, सांची म्हात्रे, नेहा पाटील, यश देशमुख, सांची म्हात्रे, सिद्धार्थ ठाकूर आदी कलाकार सहभागी झाले होते.
कुपोषण निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम
