| अलिबाग | वार्ताहर |
आपल्या संस्कृतीमध्ये गणेशोत्सवास फार महत्त्वाचे स्थान आहे. गणपती बाप्पाच्या आरास सजावटीतून अनेकदा अनेक सामाजिक आणि प्रबोधनात्मक संदेश दिले जातात. साप हे नैसर्गिक अन्नसाखळीचे अविभाज्य घटक असून, सापांचा बचाव हा पर्यायाने निसर्गाचा बचाव आहे, असा संदेश वाईल्ड लाईफ वॉरियर्सचे सदस्य अक्षय पाटील यांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या सजावटीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या भागात सापडणाऱ्या सापांचे आकर्षक फोटो सजवून श्री. पाटील घरी येणाऱ्या प्रत्येक भाविकास सापांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करत आहेत.
अक्षय पाटील हे नाव अलिबागमधील लोकांना सुपरिचित आहे. कुठेही कोणताही साप वा अन्य वन्यप्राणी आढळल्यास सर्व कामे बाजूला ठेवून त्यांच्या बचावासाठी अक्षय पाटील नेहमीच तत्पर असतात. तसेच मांजर, कुत्रा, गायी इत्यादी प्राणीसुद्धा आजारी किंवा जखमी परिस्थितीत दिसून आल्यास त्यांच्यावर योग्य औषधोपचार करण्यासाठी ते सदैव पुढे असतात. वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबागचे ते घटक आहेत, असे वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबागचे संस्थापक डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी नमूद केले.