बाल संरक्षण आणि मुलभूत हक्काबाबत जनजागृती

| महाड । वार्ताहर ।
नोबेल पारितोषिक प्राप्त वैलास सत्यार्थी यांच्या संस्थेमार्फत बाल संरक्षण आणि बालकांच्या मुलभूत हक्कांसंबंधी केल्या जाणार्‍या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ प्रतिष्ठानतर्फे महाड औद्योगिक वसाहतीतील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये पोलिस हवालदार हर्षाली डवले यांनी महिलांनी बालकांच्या प्रती आपली भूमिका मांडून त्यांच्या संरक्षणाकरीता कार्यतत्पर असले पाहीजे असे मत व्यक्त केले. तसेच 100 क्रमांकाऐवजी 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले. अ‍ॅड.सुविधा लकेश्री, अ‍ॅड.मंगेश मोहिरे यांनी महिलांवरील होणारा छळ आणि बालकांच्या संरक्षणाविषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे दिपक गायकवाड यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणार्‍या अन्यायाबाबत कायद्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला सतिश खोपकर, महेश मढवी, स्वाती कोरपे, जयदिप काहे, श्रीमती जैतपाळ, श्रीमती घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. समर्थ प्रतिष्ठानचे जयदिप वैंभार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version