सुधागड तालुक्यात ट्रॅप कॅमेरे बसविणार
| पाली/बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात घोटवडे तसेच माणखोरे विभागात शेळी, जनावरे तसेच भटक्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत माणगाव बुद्रुक येथे वन विभागाच्यावतीने नुकतेच बिबट्याबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी वन विभाग कर्मचारी व रेस्क्यू चॅरीटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने स्लाइड्स दाखवून जनजागृती केली. तसेच ग्रामस्थांच्या शंकांना समर्पक उत्तरे दिली. बिबट्याच्या हालचाली नोंद करण्यासाठी वनविभाग याठिकाणी दोन ट्रॅप कॅमेरे लावणार आहेत.
भीती नको पण सतर्क रहा, खबरदारी घ्या, असे यावेळी सांगण्यात आले. बिबट्याची जीवनपद्धती, त्याचे जैवसाखळीतील महत्व, त्याला न पकडता नैसर्गिक अधिवासात ठेवणे अशा विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला वनविभागाचे अश्विनी जाधव, शेषराव पवार, मारोती मुंडे, शिवानी शिंदे, अंकिता फफाळे, अशोक कोहकडे, योगेश साजेकर, दत्तात्रेय सावंत आदी उपस्थित होते.
ही घ्या खबदारी
वन विभागाने सांगितले आहे की खबरदारीचे उपाय म्हणून रात्री घराबाहेर पडू नका, आवश्यक असल्यास गटा गटांनी हातात काठी बॅटरी घेऊन बाहेर पडा. रात्री कुत्रे जोर जोराने भुंकत असल्यास बिबट्या जवळ असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाय म्हैस, कोंबड्या बंद गोठ्यात ठेवाव्यात, बिबट्या सहसा जाणीवपूर्वक माणसावर हल्ला करत नाही. बिबट्याला हाकलण्यासाठी त्याला दगड मारू नये व त्याचा पाठलाग करू नये ते आपणास धोकेदायक ठरू शकते, बिबट्या आल्यास भांडी वाजवा, फटाके वाजवा, जोर जोराने आरडा ओरड करा, घराच्या बाजूने रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवावी.