मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पथनाट्यातून जनजागृती

। सुतारवाडी । वार्ताहर ।
पुर्वी आदिवासी बांधव जंगलामध्ये वस्ती करून रहायचे त्यावेळी त्यांचे कुटुंब स्थलांतर नाही करायचे. परंतु जंगल तोडीमुळे जंगल नामशेष होत चालली आहेत. त्यामुळे कुटुंबाच्या उपजिविकेसाठी त्यांना कर्नाटक व इतर ठिकाणी कुटुंबासह स्थलांतर करावे लागत असल्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्‍न उभा राहतो. या गोष्टीची गंभीर दखल घेत पालीचे तहसिलदार दिलीप रायण्णावर यांनी पथनाट्य सुरु केले. हे पथनाट्य कलाकार आदिवासी वाड्यांवर जाऊन पथनाट्यातून जनजागृती करीत आहेत. गावो-गावच्या वाड्यांमध्ये आदिवासींना प्रबोधन करण्यासाठी त्यांच्याच भाषेत पथनाट्याचे सादरीकरण केले जाते. या आदिवासी भाषेतील पथनाट्याचे लेखन रा.जि.प. शाळा दर्यागावचे शिक्षक राजू बांगारे यांनी केले असून, दिग्दर्शन पाच्छापूर प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक अनिल राणे यांनी केले आहे. या पथनाट्यात नारायण हंबीर, दामू शिद, विशाल वाघमारे, महादू वारगुडे, ज्ञानेश्‍वर वारगुडे, कमलाकर शिंदे, मोरेश्‍वर कांबळे, सतिश खानेकर, जनार्दन भिलारे, दिपक दंत , बजरंग बेलोसे, कमलाकर तांडेल, राम संकाये, साई बांगारे हे कलाकार असून पथनाट्य गटाचे अध्यक्ष दत्ता वाघमारे व सचिव रोहिदास हिलम हे आहेत. आंबिवली आदिवासी शाळेत बाहास माला सालमा धाड या पथनाट्याचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वाघचौरे यांनी केले. यावेळी केंद्र प्रमुख खेमसिंग चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, उपाध्यक्ष शांताराम वाघमारे त्याचप्रमाणे अनंता जाधव, शशिकांत जगताप आदिवासी वाडीतील मुले, मुली, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version