बी.जी. पाटील यांचे उपोषण स्थगित

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिपरिचारिकाना नियमाप्रमाणे 18 महिन्यांची शासकिय नियुक्ती मिळावी या मागणीसाठी समाज क्रांती आघाडी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बी.जी. पाटील यांनी मंगळवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले बेमुदत उपोषण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या मध्यस्थीनंतर गुरुवारी तिसर्‍या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी गुरुवारी उपोषण स्थळी भेट देऊन बी.जी.पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करुन नियमानुसार उपसंचालक कार्यालयात मागण्या मांडण्याचे आश्‍वासन दिले. सदर अधिपरिचारीकांना नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यावर समाधान झाल्याने बी जी पाटील यांनी लेखी आश्‍वासन घेत डॉ.सुहास माने यांनी लिंबू सरबत पाजून उपोषण मागे घेतले.

आरोग्य विभागातील संबंधित शासकिय व प्रशासकिय पदाधिकारी व अधिकारी यांच्या अन्यायी भूमिकेमुळे 2017 मध्ये प्रशिक्षणास सुरूवात केलेल्या बंधपत्रीत अधिपरिचारीका यांनी 2019-20 मध्ये आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण करून उत्तीर्ण होऊनसुध्दा नियमाप्रमाणे 18 महिन्यांच्या शासकिय नियुक्ती आदेशापासून त्या गेले 10 महिन्यापासून वंचित आहेत. मात्र पुणे विभागातील त्याच बँचच्या अधिपरिचारिका यांना 18 महिन्यांचे शासकिय नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत व सन 2016 मधिल बँचच्या अधिपरिचारीका यांनासुध्दा नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र 2017 मधिल 15 प्रशिक्षित अधिपरिचारीका बेरोजगारी विरोधात रायगड जिल्हा समाज क्रांती आघाडी संघटनेचे अध्यक्ष बी.जी.पाटील यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून जर तरीही न्याय मिळाला नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

Exit mobile version