। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अधिपरिचारिकांना 18 महिन्याचे नियुक्ती पत्र मिळावे या मागणीसाठी स्थगित करण्यात आलेल्या उपोषणाबाबत शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र 18 महिन्यांचे आदेश प्राप्त होईपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे समाजक्रांती आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष बी.जी.पाटील यांनी सांगत उपोषण मागे घेण्यास नकार दिला.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना कळवित अधिपरिचारिकांना नियुक्ती देण्याचे प्राधिकार या कायाल्यास नसल्याने प्रस्तुत प्रकरणी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्याचे सुचित केले आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट 2017 पासून जीएनएम प्रशिक्षणास 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. 2019-20 मध्ये त्यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या बंधपात्र अधिपरिचारिकांना संबंधित आरोग्य अधिकारी व कार्यालय येथे वारंवार भेट देऊन अर्ज-विनंत्या केल्या. पण नियमाप्रमाणे 18 महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत.
या संदर्भात समाजक्रांती आघाडीच्या वतीने गेल्या महिन्यात आंदोलन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या विनंती नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र महिन्याभरात प्रशासनाकडून कुठलीच हालचाल झाली नसल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज उपोषणाचा दुसरा दिवस होता.