श्रीवर्धन शहरामधील रस्त्यांची दुरवस्था

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

श्रीवर्धन शहरामध्ये मागील दोन वर्षांपासून जलवाहिन्या नवीन टाकण्याचे काम सुरू होते. जलवाहिन्यांचे काम करणार्‍या ठेकेदाराने जलवाहिन्या टाकण्यासाठी जेवढे खोदकाम केले होते त्यावरती त्याने नवीन डांबरखडीचा मुलामा चढवून दिला आहे. यातील काही रस्त्यांचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले होते. तर, काही रस्ते जुनेच असल्याने त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत.

श्रीवर्धन बाजारपेठेतील रस्ता दादर पुलापर्यंत नूतनीकरण करण्यात आला आहे. परंतु, पुढील दादर पुलापासूनचा रस्ता बागवान मशिदीपर्यंत तर बागवान मशिदीपासून चौकर पाखाडी नाक्यापर्यंत रस्त्याला अक्षरशः खड्डयांची जाळी पडली आहे. तसेच, र.ना. राऊत विद्यालयापासून शासकीय विश्रामगृहापर्यंत जाणारा रस्ता हा देखील पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. तसेच, ओजाळे पाखाडी, केळसकर पाखाडी, दाबक पाखाडी या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमध्येदेखील डांबर खडी टाकून खड्डे बुजवणे गरजेचे आहे. आंबेडकर चौकाकडून दिवेआगरकडे जाणार्‍या रस्त्यावरती ज्युपिटर कंपनीच्यासमोर काही ठिकाणी रस्ता खचला आहे.

लवकरच गोकुळ अष्टमी व गणेशोत्सव हे सण श्रीवर्धन शहरात साजरे केले जाणार आहेत. गोकुळाष्टमीला गोविंदा नाचताना नागरिकांना अडचणीचे होणार आहे. पूर्वी शहरामध्ये गणपती विसर्जनासाठी किंवा गणपतीचे आगमन होताना गणपतीची मूर्ती डोक्यावर आणण्याची प्रथा होती. परंतु, आता सर्रासपणे हातगाडीचा वापर केला जातो. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे या सणांच्या अगोदर बुजविले न गेल्यास नागरिकांना गणपतीचे आगमन व विसर्जन अवघड होऊन बसणार आहे.

Exit mobile version