चौलनाका येथील रस्त्याची दुरवस्था

वाहतूक कोंडीचा प्रश्‍नही नित्याचाच

| रेवदंडा | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील चौल नाक्यावर रस्त्याच्या दुरवस्थेने नित्याची वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र दिसते. चौलनाक्याला तीन रस्ते एकत्रित येत असल्याने तसेच मुरूड तालुक्यातील वाढते पर्यटन यामुळे वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढीस जात आहे. गेल्या काही दिवसात अलिबाग ते मुरूड या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण, डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. या कामात चौल नाक्यावरील रस्त्याचे नूतनीकरण व दुरूस्ती करण्यात आलेली नाही. चौलनाक्यावरील रस्तावर या अगोदर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, अनेक ठिकाणी ते उखडले आहेत. त्यामुळे रस्ता खडबडीत झाला आहे. तेथून लहान-मोठी वाहने जा-ये करताना खूपच त्रासदायक ठरत आहे. वाहतुकीस सुयोग्य रस्ता न मिळाल्याने वाहतुक संथ गतीने सुरू असते. परिणामी, या रस्त्याला नित्याने वाहतूक कोंडी निर्माण झालेली दिसते.

सार्वजनिक बांधकाम खात्याने चौल नाक्यावरील रस्ताची दुरुस्ती का केली नाही, असा प्रश्‍न स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे. लवकरच पावसाळा सुरू होत असल्याने या चौल नाक्यावरील रस्ता दुरूस्ती व नूतनीकरणाचे काम संबंधितांनी त्वरित करावे, अशी मागणी प्रवासीवर्ग व वाहतूकदार करत आहेत.

Exit mobile version