रस्त्याची दुरवस्था, दिशादर्शकही गायब

वाहनचालकांमधून संताप व्यक्त

| कोलाड | वार्ताहर |

कोकणातील वाहतुकीचा कणा असणार्‍या मुंबई-गोवा महामार्गावर खांब ते रातवडपर्यंत ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तर, अपघाताच्या ठिकाणी कोलाड हद्दीतील दिशादर्शक फलकही गायब असल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा कायमच रहदारीचा असून, या महामार्गावर रोजच वाहनांची वर्दळ असते. वर्षे पूर्ण होऊनही महामार्गाचे काम आजही संथगतीने सुरू आहे. या मार्गावरील सध्या काही ठिकाणचे मोजकेच खड्डे भरले जात असून, या वर्दळीच्या मार्गावर निकृष्टरित्या बनवलेल्या रस्त्यामुळे खांब ते रातवड हद्दीत रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तर, या पडलेल्या खड्ड्यांमुळे व खड्डे चुकविण्याच्या नादात तसेच कोलाड ते रातवड परिसरात काही महत्त्वाच्या कोणतीही सूचना, रेड रिबन, वळणबिंदू, दिशादर्शक फलक, ब्लिंकर्स काम करणार्‍या ठेकेदार कंपन्यांनी लावलेले नाहीत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अपघातप्रवण क्षेत्र ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना ठेकेदार कंपन्यांना दिल्या आहेत. असे असले तरी राष्ट्रीय महामार्ग विभाग तितकाच जबाबदार आहे. महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा फटका प्रवाशांना बसत आहे. महामार्गावर कुठेही सूचना, मार्गदर्शक फलक लावले नसल्याने ते अपघाताचे कारण ठरत आहे. तरी, कोकणातील वाहतुकीचा कणा असणार्‍या मुंबई-गोवा महामार्गावर खांब ते रातवडपर्यंत खड्डे बुजवून अपघाताच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

दिशादर्शक फलक नसलेली ठिकाणे
खांब ते रातवड परिसरात सुकेळी खिंड उतारावर, खांब गावाचे हद्दीत खडी क्रशजवळ, दीपक हॉटेल, पुई बसस्टॉप, भिरा फाटा, पुड इंडियन ऑइल पेट्रोल पंप, कोलाड रेल्वे ब्रिज, कोलाड रेल्वे स्टेशन, तळवली एमसीएल कंपनी आदी ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत.

Exit mobile version