श्रीवर्धन – म्हसळा मुख्य मार्गावरती दुर्गंधी

प्रशासनाला ग्राम स्वच्छता अभियानाचा विसर

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोहिनूर प्लाझा ही अत्यंत जुनी इमारत आहे. श्रीवर्धन शहरात अत्यंत जुना असलेला सबीना ऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाच्या बाजूला जवळजवळ 15 ते 16 वर्षांपूर्वी सदर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून सदर इमारतीच्या सांडपाण्याचे व ड्रेनेजच्या पाण्याचे योग्य नियोजन केलेले नसल्यामुळे सदरचे पाणी श्रीवर्धन म्हसळे या मुख्य मार्गावरील रस्त्याच्या एकाकडेने वाहत जवळजवळ आराठी एसटी स्टॉप पर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत आले आहे. सदर इमारतीला परवानगी देताना ग्रामपंचायतीने सांडपाण्याची काय व्यवस्था केली आहे? याबाबत विकासकाकडून योग्य हमी घेणे गरजेचे होते.

सदरच्या इमारतीच्या बांधकामानंतर आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामांचे अक्षरशः पेव आलेले आहे. ग्रामपंचायतीकडून थातुरमातुर परवानगी घेऊन चार चार माळ्याच्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. मात्र, यासाठी नगररचना विभाग त्याचप्रमाणे वरिष्ठ खात्याच्या कोणत्याही परवानग्या घेतल्या असल्याचे पाहायला मिळत नाही. आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये नवीन टोलेजंग इमारती उभ्या राहत असल्यामुळे या ठिकाणच्या घनकचऱ्याचा प्रश्न देखील प्रचंड गंभीर झालेला आहे. गोखले कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा फेकण्यात येत असून, त्या ठिकाणी कचऱ्याचे प्रचंड ढिग तयार होतात. त्यामुळे त्या परिसरातून जाणारे विद्यार्थी व प्रवासी यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. सदर दुर्गंधीयुक्त सांडपाणी सततचे वाहून जात असल्यामुळे त्या ठिकाणी असलेले दुकानदार, त्याचप्रमाणे काही मांसाची दुकाने यांनाही त्याचा धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा उघड्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी श्रीवर्धन पंचायत समिती, महसूल प्रशासन व आराठी ग्रामपंचायत यांनी संयुक्त मोहीम राबवून सदर इमारतीचे सांडपाणी इमारतीच्या सोसायटी व्यवस्थापनाने योग्य सोय करून न दिल्यास त्या ठिकाणी सांडपाणी बंद करून टाकण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version