बदलापूर प्रकरणः आरोपीच्या कोठडीत वाढ

। बदलापूर । प्रतिनिधी ।

बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. यानंतर कोर्टाने अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी.ए. पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानंतर आता आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले.

याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. तसेच पोक्सो गुन्ह्यात काही कलमं वाढवण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी बनवण्यात आले आहे. अत्याचाराची घटना घडलेल्या त्या शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून, उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे.

सीसीटीव्ही फुटेज गायब
बदलापूर प्रकरणात शाळेतील सीसीटीव्हीचे मागील 15 दिवसांचे रेकॉर्डिंग गायब झाले आहेत. सीसीटीव्ही गायब झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Exit mobile version