उदय कोतवाल, तुषार आपटे यांना जामीन; दुसर्या प्रकरणात मात्र अटक
। नेरळ । प्रतिनिधी ।
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना 44 दिवसानंतर अटक करण्यात आली. आज न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. तर दुसर्या एका प्रकरणात पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली आहे. त्याआधी न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीविरोधात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने एका प्रकरणात जामीन तर दुसर्या प्रकरणात अटकेची परवानगी दिली आहे.
सरकारी वकील भामरे पाटील म्हणाले की, बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाले होते. गुन्हा क्रमांक 380 मध्ये दोन्ही आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर गुन्हा क्र. 381 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. आता दुसर्या प्रकरणातील जामिनावर उद्या सुनावणी होईल. त्यामुळे कोतवाल आणि आपटे यांना जामीन मंजूर झाला असला तरी आज कोठडीतच राहावे लागणार आहे.
बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला. याप्रकरणी पालकांनी संबंधित अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल माहिती देऊनही शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तींनी दुर्लक्ष केले. 20 ऑगस्ट रोजी शहरात झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर न्यायालयाने त्याची दखल घेत या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्या शाळेच्या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. 20 ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात झालेल्या तोडफोडीची पाहणी करणारे संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि तुषार आपटे दुसर्याच दिवसापासून फरार होते. सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयात या दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बदलापूर येथील अल्पवयीन बालकांच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर संस्थेचे पदाधिकारी हे गेली महिनाभर फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या अनेक टीम कार्यरत होत्या. 2 ऑक्टोबर रोजी कर्जत कल्याण रस्त्याने प्रवास करीत असल्याची माहिती ठाणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारला मिळाली होती. त्यामुळे सायंकाळी सहापासून ठाणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कर्जत भागात तैनात होते. रात्री साडेआठच्या सुमारास तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यातील फोन कॉलनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी कर्जत कल्याण रस्त्यावरील वांजळे गावाच्या हद्दीत वाहनांमधून प्रवास करीत असलेल्या तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडीचा ताबा घेतला. त्यानंतर नऊ वाजता त्याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे जात आपटे आणि कोतवाल यांना वांजळे येथे पकडले असल्याची नोंद पोलीस ठाणे डायरीत करण्यात आली.