रेल्वेत विसरलेली बॅग महिलेला परत

| पनवेल | वार्ताहर |

अत्यंत मौल्यवान अश्या 20 लाखाच्या घरात किंमत असणारे वैद्यकीय साहित्य असणारी बॅग रेल्वे प्रवासात विसरून गेलेल्या महिला डॉक्टरला आरपीएफने पुन्हा मिळवून दिली आहे. महिला प्रवाशाने तिच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित आणि व्यवस्थित मिळाल्याबद्दल आरपीएफचे आभार मानले.

वाशी रेल्वे स्थानकात आरपीएफ कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्म क्र 1 वर आलेल्या रेल्वेत एक काळ्या रंगाची बॅग सापडली. कर्मचाऱ्यांनी ती बॅग कार्यालयात आणून आरपीएफ उपनिरीक्षक आदेश डागर यांच्यासमोर उघडले असता, त्यात काळ्या रंगाचा डेल कंपनीचा लॅपटॉप व काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आढळून आली. मात्र बॅगेत नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आढळून आला नाही. कोणताही सुगावा न मिळाल्याने अखेर निरीक्षकांच्या आदेशानंतर एसआय आदेश डागर आणि एएसआय कैलास बोडके यांनी सदर लॅपटॉप ऑन केला. लॅपटॉपमध्ये सापडलेले व्हॉट्स ॲप उघडले आणि त्यात सापडलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून बॅग आरपीएफ पोस्ट सीएसएमटी येथे सुरक्षित स्थितीत असल्याचे सांगितले. काही वेळाने तेथे डॉ. आशिया अख्तर (36) नावाची एक महिला आली आणि सदर बॅग आपली असल्याचे सांगितले. कंपनीने तिला काम करण्यासाठी डेल कंपनीचा लॅपटॉप आणि सुमारे 20 लाख रुपये किमतीचे दंत उपचारासाठी थ्री-डी स्कॅनर आणि इतर उपकरणे दिली होती. सदर उपकरणे असलेली बॅग सानपाडा ते जीटीबी नगर रेल्वे प्रवासात विसरून गेली असल्याचे तिने सांगितले. त्यांनतर कागदपत्रांची तपासणी करून सदर महिलेला वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी महिला प्रवाशाने तिच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित आणि व्यवस्थित मिळाल्याबद्दल आरपीएफचे आभार मानले.

Exit mobile version