| खोपोली | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणारे अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. तटकरे यांची ‘फॅमिली कंपनी’ असल्याची टीका करणाऱ्या दळवींनी आधी स्वतःच्या राजकीय कुटुंबाकडे पाहावे. पत्नी आणि सून जिल्हा परिषद सदस्य असताना मुलीलाही आमदार करण्याची इच्छा होती, मग दळवींची ही प्रायव्हेट कंपनी नाही का? असा बोचरा सवाल बैलमारे यांनी उपस्थित केला. तसेच, दळवींना बोलायला लावणारा धनी कर्जतकर असल्याचा आरोपही त्यांनी आमदार थोरवेंचे नाव न घेता केला.
आमदार दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या एकेरी आणि बोचऱ्या टीकेचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर संतोष बैलमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दळवींच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भूषण पाटील, महिला तालुकाध्यक्ष संजीवनी पिंगळे, युवक तालुकाध्यक्ष नितीन तवले, कार्याध्यक्ष रोहिदास पिंगळे, सावरोली ग्रामपंचायत सदस्य सागर घोसाळकर, विशाल बारस्कर, साईराज पवार, विशाल म्हाणूनकर, राम जगताप, गुरुनाथ घोसाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैलमारे म्हणाले की, महेंद्र दळवी दोन वेळा आमदार झाले असले तरी सुनील तटकरे गेली चाळीस वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. अशा ज्येष्ठ नेत्यावर एकेरी भाषेत टीका करणे निषेधार्ह आहे. तटकरे आमच्यामुळे खासदार झाले, असे दळवी सांगत असतील, तर त्यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, असे खुले आव्हानही बैलमारे यांनी दिले.
दळवी यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना बैलमारे म्हणाले की, पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यासाठी दळवी तटकरे यांची दिल्लीमध्ये भेट घेण्यासाठी जात होते. त्यावेळी तटकरे यांना ‘साहेब’ म्हणायचे आणि आता त्यांच्यावर टीका करायची, ही भूमिका कशी योग्य? तटकरेंविषयी एवढाच द्वेष असेल, तर जिल्हा परिषदेतील सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले. विकासकामांच्या मुद्द्यावरूनही बैलमारे यांनी दळवींना लक्ष्य केले. स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी मेडिकल कॉलेजचे काम थांबविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. विकासकामांच्या बाबतीत आमदार दळवी अडथळे निर्माण करीत असल्याचा दावा करत त्यांनी शहबाज गावातील पाणीटंचाईचा मुद्दाही उपस्थित केला. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून धमकीवजा भाषा वापरली जात असल्याचा आरोप करत बैलमारे म्हणाले की, त्यांच्याकडे राजकीय यंत्रणा आणि ताकद असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेही कार्यकर्त्यांची ताकद आहे. मात्र, आमचा पक्ष विचारांचा आणि शिस्तीचा असून, संघर्षापेक्षा विकासकामांना आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
बैलमोरेंकडून दळवींच्या वक्तव्यांचा समाचार
